For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शासकीय आयटीआय संस्था खासगीकरणासाठी खुल्या

06:27 AM Feb 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
शासकीय आयटीआय  संस्था खासगीकरणासाठी खुल्या
Advertisement

मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती : खासगीकरण नव्हे एकत्रीकरण करणार असल्याचे स्पष्टीकरण

Advertisement

►  पुणे / प्रतिनिधी

राज्यातील 419 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) खासगीकरणासाठी खुल्या करण्यात येत आहेत. यात शासकीय आयटीआयवरील सरकारची मालकी कायम राहणार असून, हे खासगीकरण नव्हे तर एकत्रीकरण असणार आहे. फक्त आयटीआयचा विकास आणि क्षमता वाढविण्यासाठी मोठ-मोठ्या उद्योग समूहांसह स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेतले जाणार आहे. तर राज्यातील सर्व आयटीआयमध्ये जून 2025 पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पावले उचलण्यात येतील, अशी माहिती राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सोमवारी येथे दिली.

Advertisement

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रमाचे (टेन द टीचर्स) उद्घाटन लोढा यांच्या उपस्थितीत सोमवारी झाले. औंध येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि सावित्रीबाई फुले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात हा कार्यक्रम झाला. विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक माधवी सरदेशमुख, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, टाटा स्टाईव्हचे मुख्य कार्यपालन अधिकारी अमेय वंजारी, डॉ. भूषण केळकर, नितीन पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

 प्रशिक्षण देण्यासाठी उद्योग समूहाचे सहकार्य घेणार

लोढा म्हणाले, आयटीआयमधील शिक्षक, प्रयोगशाळा त्याच असतील. परंतु, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तज्ञ, नवीन आधुनिक प्रयोगशाळा यासाठी उद्योग समूहाचे सहकार्य घेतले जाईल. समाजासाठी काही करू इच्छिणाऱ्यांसाठी आयटीआय खुली आहे. राज्यातील सर्व आयटीआयमध्ये जून 2025 पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पावले उचलण्यात येतील, असेही लोढा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

या वेळी बोलताना सरदेशमुख म्हणाल्या, उद्योग समूहाच्या मदतीने विद्यार्थ्यांचे ज्ञान अद्ययावत करण्याचा प्रयत्न होत आहे. उद्योग समूहाच्या आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी ऑन जॉब टेनिंग, अॅप्रेंटिसशिपसाठी करार केले जातात. आयटीआयमधील यशस्वी विद्यार्थ्यांची माहिती लवकरच संकलित केली जाणार आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘आयटीआय’ला सहकार्य करणाऱ्या उद्योगसमूहांचा सत्कार करण्यात आला. तर कार्यक्रमात ऑनलाइन पद्धतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (छत्रपती संभाजीनगर, अमरावती), राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था (मुंबई) आणि इंडो-जर्मन टूल रूमचे प्रतिनिधी उपस्थित होते.

  आयटीआयसाठी 500 कोटी रुपयांची विशेष तरतूद असणार

जागतिक बँकेने आयटीआयच्या नूतनीकरणासाठी 1300 कोटी रुपये दिले आहेत. तर पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केंद्रीय योजनेत राज्यातील 100 आयटीआय दत्तक घेतली आहेत. याशिवाय राज्याच्या अर्थसंकल्पात 500 कोटी ऊपयांचा विशेष निधी आयटीआयसाठी देण्यात यावा, अशी विनंती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना केली असल्याचेही लोढा यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.