पांढरा हत्ती पोसताना सरकारचे नाकीनऊ
स्वच्छतेसाठी वर्षाकाठी 6 ते 7 कोटींची उधळपट्टी
बेळगाव : बेळगाववर आपला हक्क दाखविण्यासाठी सुवर्ण विधानसौधचे बांधकाम करण्यात आले. परंतु आता हा पांढरा हत्ती पोसताना सरकारचे नाकीनऊ येऊ लागले आहे. सुवर्णसौधच्या स्वच्छतेसाठी नुकत्याच निविदा काढण्यात आल्या. केवळ सहा महिन्यांसाठी 1 कोटी 95 लाख रुपयांचा खर्च केवळ स्वच्छतेवर राज्य सरकारला करावा लागला आहे. हलगा येथे सुवर्ण विधानसौध बांधण्यात आले. त्यानंतर वर्षातून केवळ एक अधिवेशन वगळता इतर दिवस या परिसरात शुकशुकाट असायचा. बेंगळूर येथील काही कार्यालयांचे उपकेंद्र याठिकाणी सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली. परंतु केवळ एक बँक, पोस्ट ऑफिस व काही मोजकी कार्यालये याठिकाणी सुरू ठेवण्यात आली आहेत.
एकदा अधिवेशन झाले की पुढच्या अधिवेशनापर्यंत सुवर्णसौधचा कोणताच वापर होत नाही. वापर नसला तरी स्वच्छता व डागडुजीसाठी राज्य सरकारला कोट्यावधी रुपयांचा खर्च करावा लागत आहे. 1 मार्च ते 31 ऑगस्ट 2025 या दरम्यान सुवर्णसौधमधील स्वच्छतेसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. वर्षाकाठी केवळ स्वच्छतेसाठी 4 कोटी खर्च होत आहेत. त्यामुळे हा पांढरा हत्ती सांभाळणे प्रशासनाला दिवसेंदिवस कठीण होत आहे. येथे अधिवेशन भरविले जाते. परंतु बेळगावसह उत्तर कर्नाटकावर कोणतीच चर्चा होत नाही. तसेच बेळगावच्या विकासालाही हातभार लागत नाही. त्यामुळे सरकारी पैशांची उधळपट्टीच सुरू आहे. स्वच्छतेसाठी चार कोटी व इतर डागडुजी, वीज भाडे पाहता, वर्षाकाठी 6 ते 7 कोटी खर्च होत असल्याचे दिसून येत आहे.