शासनाकडून ‘तृतीयपंथीय 2024 धोरण’ लागू
कोल्हापूर :
तृतीयपंथीयांसाठी शासनाने तृतीयपंथी धोरण 2024 लागू केले आहे. या योजनेतून शासकीय योजनांचा लाभ दिला जात आहे. यासाठी जिल्ह्यातील तृतीयपंथीयांसाठी जिह्यातील केंद्र राज्य शासनातर्फे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्यावतीने तृतीयपंथी ओळखपत्र आणि प्रमाणपत्र दिले जाणार असल्याची माहिती मैत्री एचआयव्ही, एड्स संघटनच्या शिवानी गजबर यांनी दिली.
गुरूवारी रिलायन्स मॉल येथील मैत्री संघटनच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. याबाबत जागरूकता निर्माण करून हे प्रमाणपत्र व ओळखपत्र तृतीयपंथीय घटकापर्यंत पोहचविणार असुन याच लाभ जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
गजबर म्हणाल्या, मैत्री संघटनच्या अध्यक्षा मयुरी आळवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तृतीयपंथीयांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. आता तृतीयपंथायांची नोंदणी करून ओळखपत्र देण्यात येणार आहे. ओळखपत्राच्या आधारे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे सुलभ होणार आहे. आरोग्य सेवा, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी, ब्रिस्ट ऑग्मेंटेशन सर्जरी, लिंग बदल शस्त्रक्रिया आदी आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता करण्यात आली आहे.
शासकीय योजनांमध्ये संजय गांधी निराधार योजना, पेन्शन योजना आणि रेशन कार्ड काढण्यासाठी ओळखपत्र आवश्यक ठरणार आहे. याआधारे तृतीयपंथीय घटकांना उद्योग व व्यवसायासाठी शासकीय निधी मिळणार आहे. जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी मैत्री संघटनशी संपर्क साधावा, असे आवाहन गजबर यांनी केले. यावेळी मैत्री संघटनेच्या सुहासिनी आळवेकर, अफझल बारस्कर, कय्युम अत्तार, उपस्थित होते.