ड्रग्ज तस्करीला आळा घालण्यात सरकार पूर्णपणे अपयशी
विरोधी पक्षनेते आर. अशोक यांचा आरोप
बेंगळूर : राज्यातील ड्रग्ज व्यापार रोखण्यात काँग्रेस सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केला. याबद्दल सोशल मीडियावर ट्विट करताना, बेळगाव येथील हिवाळी अधिवेशनात आपण हा मुद्दा उपस्थित केला असता तेव्हा गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात न घेता ड्रग्ज व्यापार सर्व राज्यांमध्ये सुरू आहे असे म्हणत उत्तर दिले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या जुलैमध्ये महाराष्ट्र पोलिसांनी म्हैसूरमध्ये एक ड्रग्ज उत्पादन युनिटचा शोध लावून तेथे सुमारे 390 कोटी रुपयांचे 192 किलो जी. मेफेड्रोन ड्रग्ज जप्त केले होते. आता बेंगळूरमधील 3 ड्रग्ज कारखान्यांवर छापे टाकून 56 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. शौर्य, धाडस आणि कार्यक्षमतेसाठी ओळखले जाणारे कर्नाटक पोलीस खाते आज काँग्रेस सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे कमकुवत झाले आहे. कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज रॅकेटचा शोध घेण्यासह ड्रग्ज तस्करांना अटक करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांना यावे लागत आहे तर कर्नाटक पोलीस खाते काय करत आहे. राज्याचा गुप्तचर खाते झोपले आहे का, असा प्रश्नही आर. अशोक यांनी उपस्थित केला.