हरियाणात सरकार स्थापनेच्या हालचाली
पंतप्रधान मोदी यांच्याशी सैनी यांची भेट, दसऱ्यादिवशी शपथविधी होण्याची शक्यता
वृत्तसंस्था / नवी दिल्ली, चंदीगढ
हरियाणात सलग तिसरा विक्रमी विजय मिळविल्यानंतर भारतीय जनता पक्षाने त्या राज्यात सरकार स्थापनेच्या हालचाली करण्यास प्रारंभ केला आहे. विद्यमान मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्याच गळ्यात पुन्हा मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार, हे निश्चित मानले जात आहे. दसऱ्यादिवशी, अर्थात, 12 ऑक्टोबरला ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
नायाब सिंग सैनी यांच्या नेतृत्वातच भारतीय जनता पक्षाने हरियाणात घवघवीत यश मिळविले आहे. विजयाची हॅटट्रिक साध्य करणारा हा या राज्यातील पहिलाच पक्ष आहे. आतापर्यंत काँग्रेस किंवा भारतीय राष्ट्रीय लोकदल यांनाही हे साध्य झालेले नाही. सैनी यांची प्रतिमा जनमानसात एक दक्ष आणि विनम्र नेता अशी आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनी अतिशय शांतपणे आणि कोणताही गाजावाजा न करता हरियाणातल्या अठरापगड जातींना एकत्र आणून हिंदुत्वाच्या भावनेने त्यांना भारतीय जनता पक्षाच्या मागे उभे केले होते. त्यामुळे 10 वर्षांच्या प्रस्थापित विरोधी भावनेला मागे टाकणे पक्षाला शक्य झाले, असे निरीक्षण अनेक राजकीय तज्ञांनी नोंदविले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठीचे सर्वात प्रमुख नेते म्हणून त्यांच्याच नावाचा अग्रक्रमाने विचार केला जात असल्याचे दिसून येते.
मंत्रिमंडळ स्थापनेसंबंधी चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी नायब सिंग सैनी यांची साधारणपणे तासभर चर्चा झाली. या चर्चेची माहिती अधिकृतरित्या उघड करण्यात आलेली नाही. तरी सूत्रांच्या म्हणण्यानुसार सैनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मंत्रिमंडळ स्थापनेसंदर्भात चर्चा केली. मंत्रिमंडळ समतोल असावे आणि सर्व समाजघटकांच्या लोकप्रतिनिधींचा त्यात समावेश असावा, अशी रुपरेषा सज्ज करण्यात आल्याचे समजते.
वरिष्ठ नेत्यांशीही भेट
नायब सिंग सैनी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जगतप्रकाश न•ा, विनोद तावडे आणि राजनाथ सिंग यांचीही भेट घेऊन बोलणी केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. हरियाणाच्या आगामी मंत्रिमंडळात तरुण चेहऱ्यांचाही समावेश मोठ्या प्रमाणात केला जाण्याची शक्यता आहे. नव्या सरकारच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक महत्वाचे केंद्रीय नेते उपस्थित राहतील, अशी चर्चा आहे.
तीन अपक्षांचा भाजपला पाठिंबा
हरियाणा विधानसभेत निवडून आलेल्या तीन अपक्षांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच हे अपक्ष आमदार दिल्लीत येणार असून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची चर्चा करणार आहेत. त्यांच्या पाठिंब्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या सरकारचे बळ आणखी वाढणार आहे. या अपक्ष आमदारांमध्ये सावित्री जिंदाल या भारतीय जनता पक्षाच्याच बंडखोर महिला नेत्याचाही समावेश आहे. सावित्री जिंदाल या सर्व नवनिर्वाचित आमदारांमध्ये सर्वात धनवान म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी प्रथम पाठिंबा घोषित केला आहे.
जम्मू-काश्मीरमध्येही...
जम्मू काश्मीरमध्येही सरकार स्थापना करण्याची तयारी होत आहे. येथे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांच्या युतीला बहुमत मिळाले असून ओमर अब्दुल्ला हे मुख्यमंत्रिपदी येतील हे निश्चित आहे. शपथविधीपूर्वी सत्तावाटपाचे सूत्र ठरविले जावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. मात्र, अद्याप या मागणीवर नॅशनल कॉन्फरन्सने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त पेलेली नाही. तसेच नव्या सरकारच्या शपथविधीचा दिनांकही अद्याप ठरलेला नाही. मात्र, येत्या एका आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होईल अशी शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.