हरियाणात सरकार स्थापना लांबणीवर ?
उपमुख्यपदांसंबंधीची चर्चा अद्यापही निर्णयाविना
वृत्तसंस्था/नवी दिल्ली, चंदीगढ
हरियाणात सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला वेग आला असला तरी, सरकार स्थापना दसऱ्याच्या दिवशी होणार नसल्यानी चर्चा आहे. मुख्यमंत्रीपदी नायाबसिंग सैनी यांचीच निवड केली जाणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र, अद्याप तशी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच नवनिर्वाचित आमदारांनी नेता निवडीसाठी बैठक केव्हा होणार हेही निश्चित नसल्याचे दिसून येत आहे. विद्यमान मुख्यमंत्री नायाबसिंग सैनी यांनी बुधवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. मंत्रीमंडळाच्या रचनेसंदर्भात त्यांच्यात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र, मंत्रीमंडळात कोणाचा समावे होणार, तसेच उपमुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
लाओस दौऱ्यानंतर शपथविधी
हरियाणात सरकार स्थापना होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती असणे आवश्यक मानण्यात आले आहे. नायाबसिंग सैनी आणि नवनिर्वाचित आमदारांची तशी इच्छा आहे. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लाओस दौरा गुरुवारपासून होत आहे. ते परत आल्यानंतर शपथविधीचा दिनांक निर्धारित करण्यात येणार आहे. त्यामुळे विजयादशमीचा मुहूर्त साधणे शक्य होणार नाही, असे मत व्यक्त करण्यात आले आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत कधीही नव्या सरकारची स्थापना होऊ शकते, अशी माहिती केंद्र सरकारच्या सूत्रांनी दिली आहे.
भाजपची हॅटट्रिक
हरियाणात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विजयाची हॅटट्रिक केली आहे. सलग तिसऱ्यांना या पक्षाला सरकार स्थापनेची संधी मतदारांनी दिली आहे. या विधानसभा निवडणुकीत या पक्षाने हरियाणात आपल्या सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. या पक्षाला एकंदर 90 जागांपैकी 48 जागांवर विजय मिळाला असून काँग्रेसला 37 जागांवर समाधान मानावे लागले आहे. सर्व प्रादेशिक पक्षांचा धुव्वा उडाला आहे. ही निवडणूक काँग्रेस सहजगत्या जिंकेल असे प्रारंभीचे अनुमान होते. तथापि, सर्व अनुमानांना खोटे ठरवून भारतीय जनता पक्षाने मोठा विजय या राज्यात प्राप्त केला आहे.
नेत्यांच्या भेटीगाठी
हरियाणातील भारतीय जनता पक्षाच्या काही नवनिर्वाचित आमदारांनी दिल्लीत पक्षनेत्यांशी चर्चा केल्याचे समजते. महिपाल ढांडा आणि खासदार कार्तिकेय शर्मा यांनी नायाबसिंग सैनी यांच्याशी चर्चा केल्याची सूत्रांची माहिती आहे. काही खासदारही मंत्रीमंडळात स्थान मिळेल अशा अपेक्षेत असल्याची चर्चा आहे. मात्र, अधिकृतरित्या अशा वृत्तांना दुजोरा देण्यात आलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा लाओस दौरा आटोपून भारतात परत आल्यानंतरच शपथविधी होणार आहे.
काँग्रेसची तक्रार
गुरुवारी काँग्रेसने केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. काँग्रेसचे एक प्रतिनिधीमंडळ या अधिकाऱ्यांच्या भेटीस गेले होते. के. सी. वेणुगोपाल, अशोक गेहलोत, जयराम रमेश, अजय माकन, भूपिंदरसिंग हु•ा आणि अन्य नेत्यांचा या प्रतिनिधीमंडळात समावेश होता. काँग्रेसने निवडणूक आयोगासमोर 20 तक्रारी सादर केल्या आहेत. तसेच आयोगाने या तक्रारीसंबंधातील मतदान यंत्रे सील करावीत अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. येत्या 48 तासांमध्ये उरलेल्या तक्रारीही निवडणूक आयोगाला सादर केल्या जातील, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. तथापि, काँग्रेसची तक्रार नेमकी काय आहे, याचे स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेले नाही. काही मतदान यंत्रांची बॅटरी अधिक प्रमाणात चार्ज करण्यात आली होती, असा काँग्रेसचा आरोप आहे. तथापि, याचा मतदानाशी किंवा मतगणनेशी संबंध कसा पोहचतो, हे स्पष्ट झालेले नाही.