बेळवट्टी गावच्या पटांगणासाठी हवा शासनाचा आधार
सुसज्ज पटांगणाअभावी विद्यार्थी खेळांपासून वंचित : बहुतांशी गावांमध्ये पटांगणाची कमतरता
वार्ताहर /किणये
खेळ खेळण्याने शरीर तंदुरुस्त राहते. वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांमुळे संपूर्ण शरीराची हालचाल होते. काही खेळ एकट्याने खेळायचे असतात तर बहुतांशी खेळ खेळाडू एकत्रित येऊन खेळतात. सध्याच्या आधुनिक व धावपळीच्या युगात शरीराच्या व्यायामासाठी खेळ महत्त्वाचे आहे. मात्र बहुतांशी गावामध्ये पटांगणाची कमतरता भासू लागली आहे. यामुळे विद्यार्थी व तरुणाई खेळापासून वंचित राहत आहेत. बेळवट्टी गावात पटांगण उपलब्ध आहे. मात्र या पटांगणाची योग्यरितीने सपाटीकरण करून त्याचा विकास करायला हवा. या पटांगणासाठी शासनाचा आधार हवा आहे.
तालुक्याच्या अनेक गावांमध्ये पटांगणे(मैदान) नाहीत. यामुळे बरेचशे विद्यार्थी व गावातील खेळाडूंना अनेक प्रकारचे खेळ खेळण्याची अडचण निर्माण होऊ लागली आहे. काही खेळाडुंना खेळण्याची इच्छा असूनही पटांगणाअभावी त्यांचे खेळ अधुरे राहू लागले आहेत. बऱ्याच गावांमध्ये मैदानांचा आकार कमी होतानाचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या भावी पिढीसाठी प्रत्येक गावांमध्ये खेळासाठी योग्य व सुरक्षित पटांगण उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक गावातील गावकऱ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
बेळवट्टी गावातील हायस्कुलच्या बाजुला गावचे पटांगण आहे. गेल्या पाच वर्षापूर्वी गावकरी व काही माजी विद्यार्थ्यांनी या मैदानाचे सपाटीकरण केले होते. या मैदानावरती सध्या खो खो, फुटबॉल, क्रिकेट, उंच उडी, लांब उडी, कब•ाr, बॅडमिंटन, बास्केटबॉल, थ्रो बॉल, पकडापकडी व व्हॉलीबॉल आदी खेळ हायस्कूल व शाळेचे विद्यार्थी व तसेच गावातील तरुण खेळतात. मात्र मैदानाचे योग्य प्रकारे सपाटीकरण करण्यात आले नाही. बाजुला मोठमोठे दगड आहेत. त्यामुळे खेळताना अडचणी निर्माण होऊ लागली आहे, अशी माहिती गावातील काही तरुणांनी दिली आहे.
विकास झाल्यास 320 खेळाडुंना लाभ
विश्वभारत सेवा समिती संचलित बेळवट्टी गावातील हायस्कूलमध्ये एकूण 8 वी ते 10 पर्यंत 140 विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. या विद्यार्थ्यांना याच मैदानावर रोज विविध खेळांचे सराव करावे लागतात. तसेच गावात प्राथमिक मराठी शाळा आहे. या शाळेतही 180 विद्यार्थ्यांची पटसंख्या असून रोजचे खेळ शाळेजवळ खेळतात तर मोठे खेळ असतील तर या विद्यार्थ्यांनाही या मैदानावर यावे लागते. त्यामुळे या मैदानाचा योग्य प्रकारे विकास झाल्यास सुमारे 320 खेळाडुंना याचा रोज लाभ घेता येणार आहे. तसेच गावातील खेळाडूंनाही विविध प्रकारचे खेळ खेळता येऊ शकतात.
मैदानाच्या सपाटीकरणासाठी शासनाकडून मदतीची गरज
सध्या मराठी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होऊ लागली आहे. त्यामानाने बेळवट्टी हायस्कूलमध्ये व शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या बऱ्यापैकी आहे. बेळवट्टी हायस्कूलला बेळवट्टीसह बाकनूर, इनाम बडस, बेटगेरी, गोल्याळी, धनगरवाडी या गावातील विद्यार्थी येतात. विद्यार्थ्यांमध्ये खेळांची आवड अधिक आहे. त्या दृष्टिकोनातून गावात असलेल्या या मैदानाचे योग्य रितीने सपाटीकरण करायला हवे. यासाठी शासनाकडून मदत मिळणे गरजेचे आहे.
- एन. एस. गाडेकर, माजी शिक्षक
निधी मंजूर केल्यास पटांगण सुसज्ज बनवणे शक्य
शाळा व हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांबरोबरच गावातील तरुणांना हे मैदान एक वरदान ठरणार आहे. या मैदानात रोज क्रिकेट, व्हॉलीबॉल, कब•ाr असे विविध खेळ खेळता येतात. प्रशासनाकडून विविध योजनांसाठी निधी मंजूर केला जातो. या पटांगणासाठी निधी मंजूर करून याठिकाणी सुसज्ज असे पटांगण बनविल्यास बेळवट्टीसह या भागातील अनेक खेळाडूंसाठी हे पटांगण महत्त्वाचे ठरू शकणार आहे.
- श्रीधर पाटील, खेळाडू