थिवीत खाजगी विद्यापीठ स्थापनेवर सरकारची मोहर
वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीला 2 लाख चौ. मी. जमीन प्रदान
पणजी : खाजगी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी थिवी येथे सुमारे 2 लाख चौरस मीटर जमीन वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी या खाजगी विद्यापीठाला देण्याच्या निर्णयास काल बुधवारी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. ही जमीन गुंतवणूक प्रोत्साहन क्षेत्र (आयपीए) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या विद्यापीठाद्वारे अभियांत्रिकी, सागरी अभियांत्रिकी, वैद्यकीय विज्ञान, व्यवस्थापन अभ्यास, कला, पत्रकारिता, सार्वजनिक धोरण यांसह अन्य विविध अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहेत.
एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिटयूशन्स संचलित महाराष्ट्र अभियांत्रिकी आणि शैक्षणिक संशोधन अकादमी या संस्थेकडून वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी नावाने खाजगी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाला ऑनलाइन अर्ज प्राप्त झाला होता. त्यासंबंधी गेल्यावर्षी 11 जुलै रोजी झालेल्या 36 व्या बैठकीत या प्रकल्पाला तत्वत: मंजुरी दिली होती. त्यानुसार गुंतवणूक प्रोत्साहन क्षेत्र म्हणून दोन लाख चौरस मीटर जमीन घोषित करण्याची शिफारस केली होती.
त्यानंतर सरकारने या प्रकल्पासाठी सूचना आणि हरकती मागवल्या होत्या. संबंधित प्राप्त आक्षेपांवर नंतर जीआयडीसीच्या एमडी कडून सुनावणी घेण्यात आली व अंतिम निर्णयासाठी सरकारला अहवाल सादर केला. मात्र सदर आक्षेप गंभीर स्वऊपाचे नसल्याचे कारण देत सरकारने ते निकाली काढले व एक खडिकी योजनेंतर्गत सदर जमीन गुंतवणूक प्रोत्साहन क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे निर्देश उद्योग खात्याला दिले.