कंग्राळी खुर्द, अलतगा, गौंडवाड, यमनापूर परिसरामध्ये गौराईचे पारंपरिक पद्धतीने पूजन
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक, कंग्राळी खुर्द, अलतगा, गौंडवाड,यमनापूर परिसरामध्ये मंगळवारी गौराईचे पारंपरिक पद्धतीने मोठ्या भक्तिभावाने व अमाप उत्साहात घरगुती गणपती व सार्वजनिक गणपतीसमोर कुमारीकांच्यावतीने स्वागत व प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. गौराई ही गणपतीची बहीण असल्यामुळे गणेश चतुर्थीनंतर चौथ्या तो पाचव्या दिवशी गौराई गणपतीला भेटण्यासाठी येते. तेव्हा तिचे हे स्वागत अशा रूपाने केले जाते, अशी आख्यायिका आहे. मंगळवारी सकाळी तांब्याच्या कलशमध्ये पाच विविध प्रकारची फुले, यामध्ये पेरूची पाने, हिरवळ नारळ याची आराधना करणे हे काम कुमारीकांकडून सुरू होते. या कुमारिकांच्या एका विहिरीवर विहीरीचे ताजे पाणी या कलशमध्ये भरून विहिरीवर विधीवत पूजन करतात. त्यानंतर घरोघरी या गौराईचे घरगुती व सार्वजनिक गणपतीसमोर प्रतिष्ठापना करून अशा रूपाने बहीण भावाची भेट घडवून आणण्याचे काम करतात. नंतर भोपळ्याचे कोवळे पान, शेपू, आंबाडा चवळीचे पान व राजगीरा या पालेभाजींची भाजी करून जोंधळ्याच्या पिठाची भाकरी व वरील भाजीचा विधीवत नैवेद्य दाखविण्यात येतो.