गोतस्करांनी घेतला महिला अधिकाऱयाचा जीव
रांचीमधील धक्कादायक घटना
रांची : हरियाणानंतर आता झारखंडमध्ये गुन्हेगारांनी एका पोलीस अधिकाऱयाचा वाहनाने चिरडून जीव घेतला आहे. रांचीच्या तुपुदाना भागात एक पिकअप व्हॅनच्या चालकाने महिला पोलीस अधिकाऱयाला चिरडून ठार केले आहे. ही घटना मंगळवारी रात्री रशिरा घडली आहे.
रात्री 2 वाजता महिला पोलीस उपनिरीक्षक संध्या टोपनो यांना गुरांनी भरलेली एक पिकअप व्हॅन जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी वाहनांची तपासणी सुरू केली. एका पिकअप व्हॅनला रोखण्याचा प्रयत्न केल्यावर ही व्हॅन त्यांना चिरडून भरधाव वेगाने पसार झाली. घटनेनंतर पोलिसांनी पिकअप व्हॅनचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर पिकअप व्हॅन उलटली होती. पोलिसांनी व्हॅनचालकासह दोन जणांना अटक केली आहे. तर महिला पोलीस अधिकारी संध्या टोपनो यांच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. संध्या यांच्या पार्थिवार गुरुवारी अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. यापूर्वी हरियाणाच्या नूंह जिल्हय़ात मंगळवारी अशीच घटना घडली. तपासणीदरम्यान खाणमाफियांनी पोलीस उपअधीक्षकांच्या अंगावर डंपर घातला होता. या घटनेत पोलीस उपअधीक्षक सुरिंदर सिंह यांना जीव गमवावा लागला होता. यातील आरोपींना पकडण्यात आले आहे. तर एका आरोपीचा चकमकीत मृत्यू झाला आहे.