गॉसिपिंग करणे आरोग्यासाठी चांगले
गॉसिपिंग करण्याची सवय वाईट असते हे तुम्ही अनेकांकडून ऐकले असेल. परंतु गॉसिपिंगची सवय ही लोकांना नैसर्गिक स्वरुपात मिळाली आहे. गॉसिपिंग चांगले असून त्यामुळे प्रकृती चांगली राहत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. इटलीमधील पाविया युनिव्हर्सिटी आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीत यासंबंधी संशोधन झाले आहे. ‘सेपियन्स-ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ मॅनकाइंड’चे लेखक युवल नोह हरारी यांनी स्वतःच्या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे.
गॉसिपिंगची सवय लोकांना आनंद देणारी असल्याचे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनातून समोर आले आहे. गॉसिपिंगची सवय आम्हाला वारशादाखल मिळाली आहे, म्हणजेच आमच्या डीएनएमध्ये ती आहे. बोलण्याच्या कलेपर्यंत माणूस पोहोचल्यावर भाषेचा विकास झाला, त्याचसोबत गॉसिपचा देखील विकास झाल्याचे संशोधनासंबंधी प्रसिद्ध लेखात म्हटले गेले आहे.
गॉसिप केल्याने लोक अधिक तंदुरुस्त, प्रसन्न होतात. गॉसिंपवेळी मेंदूमध्ये हार्मोनची पातळी वाढते, ज्याला ऑक्सिटोसिन म्हटले जाते, तसेच याला लव्ह हार्मोनही असे संबोधिण्यात येते. यामुळे वेगळय़ा आनंदाची अनुभूती पूर्ण शरीराला होत असल्याचे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या इव्होल्युशनरी सायक्लॉजी डिपार्टमेंटचे प्राध्यापक रॉबिन डनबर यांनी म्हटले आहे.
संभाषणात मोठे प्रमाण
दोन व्यक्ती जेव्हा बोलत असतात, तेव्हा त्यांच्या संभाषणात 80 टक्के हिस्सा गॉसिपिंगचा असतो. बिचिंग किंवा बॅकबायटिंग स्वतःला अजब पद्धतीने हलके आणि आनंदी भावना मिळवून देते. गॉसिपिंगमुळे शरीरात फील गुड हार्मोन रिलिज होऊ लागतात, ते सेरोटोनिन प्रमाणे असतात.
ऑक्सिटोसिनची निर्मिती
इटलीच्या पाविया युनिव्हर्सिटीत 22 महिलांच्या एका गटावर अध्ययन करण्यात आले. या अध्ययनात गॉसिपिंग होत असताना ऑक्सिटोसिन निर्मिती सुरू होत असल्याचे आणि ते रक्त आणि मेंदूत पोहोचत असल्याचे आढळून आले.