सांगली जिल्हा बँकेत गोपीचंद पडळकरांची बाजी; २० मतांनी विजय, न्यायालयीन लढाईनंतर संचालकपदावर शिक्कामोर्तब
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी ३ नोव्हेंबर रोजी मिरज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनात पार पडली. बँकेच्या सहा जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली होती. बहुतांश जागा बिनविरोध झाल्याने जत सोसायटी गटातील लढतीकडे विशेष लक्ष लागले होते.
न्यायालयीन संघर्षानंतर निवडणुकीत विजय
जत सोसायटी गटातून गोपीचंद पडळकर यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर त्यांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता. या प्रकरणाने न्यायालयीन वळण घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठापर्यंत मजल मारली. तेथे उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आल्यानंतर पडळकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली.
सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय बाजूला ठेवत पडळकर यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला. त्यामुळे त्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. या कायदेशीर घडामोडींमुळे त्यांची निवडणूक राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली होती.
जयंत पाटील-पडळकर संघर्षाची चर्चा
जत सोसायटी गटातील लढतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला होता. पडळकर यांना जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात प्रवेश मिळू नये, यासाठी विरोधकांकडून रणनीती आखली जात असल्याची चर्चा होती. मात्र, मतमोजणीत पडळकर यांनी स्पष्ट आघाडी घेत विजय मिळवला.
संजय पाटील यांचाही विजय
दरम्यान, तासगाव सोसायटी गटातून माजी खासदार संजय पाटील यांनीही विजय मिळवला आहे. त्यामुळे सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत या दोन्ही नेत्यांच्या विजयाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. पडळकर यांच्या विजयामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
