गोपाळ चौकेकर यांना बापूभाई शिरोडकर स्मृती आदर्श समाजसेवक पुरस्कार
चौके/प्रतिनीधी
कट्ट्याचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बापूभाई शिरोडकर यांच्या स्मृत प्रित्यर्थ देण्यात येणारा आदर्श समाजसेवक पुरस्कार यावर्षी चौके गावचे सुपुत्र श्री. गोपाळ सहदेव चौकेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार शनिवार दि १७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके च्या सभागृहात बिजेंद्र गावडे, स्थानिक समिती अध्यक्ष, चौके पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई, सदाशिव गावडे गुरुजी, डॉ सुमेधा नाईक, सहयोगी प्राध्यापक सका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण यांचे प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.श्री. गोपाळ चौकेकर हे चौके, ता. मालवण या गावचे रहिवासी असून ते अनेक वर्ष सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत.गोपाळ चौकेकर हे चौके येथील भ. ता. चव्हाण, महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय , चौके या शाळेत कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. ते स्वभावाने अत्यंत नम्र असून सर्वांना मदत करण्याचा त्यांचा स्वभाव आहे.सन २००७ मध्ये ते मालवण पंचायत समितीमध्ये सदस्य म्हणून निवडून आले होते. त्या काळात त्यांनी सर्व सामान्य लोकांच्या अनेक प्रश्नांना पंचायत समिती मध्ये उपस्थित करून त्यांची सोडवणूक करून घेतली. सार्वजनिक विकासाच्या अनेक योजना आपल्या भागात कार्यक्षमतेने पूर्ण करून घेतल्या. लोकप्रिय कामसू पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी नाव लौकीक मिळवला.लोकांची अगदी छोटी छोटी कामे त्यांनी पूर्ण केली आहेत.दारिद्र्य रेषेखालील लोकांना अर्थसहाय्य, संजय गांधी निराधार योजना यांचा लाभ अनेक गरजू लोकाना मिळवून दिला. सतत लोकांच्या, सामान्यांच्या भल्याचा विषय त्यांच्या मनात असतो.चौके गावचे लोकनियुक्त सरपंच म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले. त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा अपंग संस्थेतफे आदर्श सरपंच पुरस्कार सुद्धा मिळाला आहे.जिल्हा व तालुका समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे.त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेचा बापूभाई शिरोडकर स्मृति आदर्श समाजसेवक पुरस्कार त्यांना जाहीर झाला. आहे. बॅ. नाथ पै सेवांगणचा पुरस्काराचे हे २५ वे वर्ष असून या अगोदर डॉ. दादासाहेब वराडकर, कॅप्टन रामकृष्ण गावडे, व्ही. व्ही. प्रभू , संगीता आकेरकर, राणे बाई, प्रभाकर वाईरकर, आदींना हा पुरस्कार मिळाला आहे.या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन बापू तळवडेकर ,वैष्णवी लाड ,शाम पावसकर ,किशोर शिरोडकर, दीपक भोगटे ,विकास म्हाडगुत यांनी केले आहे.