भारताला ‘एआय’ हब बनविण्यासाठी गुगलचा पुढाकार
मोफत कोर्सेसपासून शालेय कार्यक्रमांपर्यंत राबविणार विविध उपक्रम
वृत्तसंस्था/बेंगळुरु
‘गुगल आय/ओ कनेक्ट 2026’ मध्ये भारताला ‘एआय’ हब (कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र) म्हणून प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने नवीन वैशिष्ट्यो, मोफत कोर्सेस, शिक्षकांसाठी ‘एटीएल साथी’ हे साधन आणि 25 भारतीय भाषांमध्ये ‘जेमीनी लाईव्ह’ सुरू करण्याबाबत घोषणा करण्यात आल्या. भारताला एआयचे पुढील प्रमुख केंद्र बनवण्याच्या दिशेने गुगलने एक मोठे पाऊल उचलले आहे. यासाठी कंपनीने मंगळवारी नवीन सुरक्षा वैशिष्ट्यो, ‘ऑन-प्रिमाइस’ (संस्थेच्या स्वत:च्या पायाभूत सुविधांवर आधारित) एआय कम्प्युटिंग पर्याय आणि अनेक नवीन एआय शिक्षण कार्यक्रमांची घोषणा केली. देशातील उद्योग, डेव्हलपर्स आणि स्टार्टअप्सना अशा एका नवीन युगासाठी सज्ज करणे हा यामागचा उद्देश आहे, जिथे एआय केवळ प्रश्नांची उत्तरे देण्यापलीकडे जाऊन विविध कामे स्वायत्तपणे (स्वयंचलितपणे) करू शकेल.
बेंगळूरू येथे आयोजित ‘गुगल आय/ओ कनेक्ट इंडिया 2026’ कार्यक्रमात कंपनीने माहिती दिली की, त्रयस्थ संस्थांच्या मूल्यांकनानुसार, 2025 मध्ये भारतातील ‘गुगल पे’ आणि अँड्रॉईड इकोसिस्टमने अॅप डेव्हलपर्स आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अंदाजे 5.3 लाख कोटी रुपयांची महसूल क्षमता निर्माण केली. 2024 च्या तुलनेत ही आकडेवारी 28 टक्के अधिक आहे. गुगल डीपमाईंडचे भारत आणि आशिया-पॅसिफिक क्षेत्राचे वरिष्ठ संचालक डॉ. मनीष गुप्ता यांनी सांगितले की, एआयचे खरे यश केवळ त्याच्या तांत्रिक क्षमतांवरून नाही, तर ते लोक आणि समाजात घडवून आणत असलेल्या सकारात्मक बदलांवरून ठरते.
यापैकी एका उपक्रमात गुगल डीपमाईंडचा एआय रिसर्च फौउंडेशन हा कोर्स उपलब्ध करून देण्याचा समावेश आहे. हा 56 तासांचा मोफत ऑनलाइन कोर्स आहे, जो सहभागींना ‘लार्ज लँग्वेज मॉडेल्स’ तयार करणे व सुधारणे आणि अत्याधुनिक एआय संशोधन करणे यासाठी प्रशिक्षित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, गुगलने जाहीर केले की एम्स दिल्लीतील संशोधक भारताच्या विशिष्ट गरजांनुसार नवीन एआय साधने विकसित करण्यासाठी त्यांच्या ‘मेड-जेमिनी’ या ओपन-सोर्स एआय मॉडेलचा वापर करत आहेत. या साधनांचा वापर कुष्ठरोग तसेच लैंगिक आणि प्रजनन आरोग्याशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी केला जाईल. तसेच, गुगलने आपल्या ‘जेमिनी लाइव्ह’ या वैशिष्ट्याचा विस्तार केला आहे; आता हे वैशिष्ट्या संस्कृत, भोजपुरी आणि मैथिलीसह 25 भारतीय भाषा आणि बोलीभाषांना सपोर्ट करेल.