गुगलकडून भारतामधील जाहिरात खात्यांवर कारवाई
जवळपास 17 लाख खाती केली निलंबित : 2025 पर्यंत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कपंन्यांचा समावेश
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
टेक कंपनी गुगलने 2025 पर्यंत भारतातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 48.37 कोटी जाहिराती काढून टाकल्या आहेत.(ब्लॉक केल्या) दरम्यान, कंपनीने आपल्या जेमिनी या एआय प्लॅटफॉर्मच्या मदतीने 17 लाख जाहिरातदार खाती निलंबितही केली असल्याची माहिती आहे. गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या गुगलच्या अॅडव्हरटाईज 2025 च्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.
प्राप्त अहवालानुसार, जागतिक स्तरावरही मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षी जगभरात 83 कोटींहून अधिक चुकीच्या जाहिराती हटवण्यात आल्या यासोबतच, 2.49 कोटी जाहिरातदारांची खाती निलंबितही करण्यात आली आहेत. कंपनीचा दावा आहे की, हटवण्यात आलेल्या एकूण जाहिरातींपैकी 99 टक्के जाहिराती वापरकर्त्यांनी पाहण्यापूर्वीच थांबवण्यात आल्या.
जेमिनी एआयमुळे गुगलची शक्ती वाढते
गुगलने म्हटले आहे की, जेमिनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेलच्या समावेशामुळे त्यांच्या क्षमतांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आजकाल घोटाळेबाज दिशाभूल करणाऱ्या जाहिराती तयार करण्यासाठी जनरेटिव्ह एआयचा वापर करत आहेत. जेमिनीमुळे अशा फसवणूक करणाऱ्यांना रिअल-टाइममध्ये ओळखणे आणि थांबवणे सोपे होते. 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये वापरकर्त्यांच्या तक्रारींवर चारपट वेगाने कारवाई करण्यात आली, यावरून त्याच्या कार्यक्षमतेचा अंदाज लावता येतो.
गुगलचे अॅड प्रायव्हसी अँड सेफ्टीचे व्हीपी आणि जनरल मॅनेजर कीरत शर्मा म्हणाले की, त्यांचे संघ दिवसाचे 24 तास काम करतात. कंपनीचे नवीन मॉडेल्स आता केवळ कीवर्ड्सवर अवलंबून नाहीत, तर जाहिरातींमागील हेतूदेखील समजून घेतात. हे मॉडेल्स खात्याचे व्यवहार यांसारख्या अब्जावधी डेटाचे विश्लेषण करतात. पकडले जाणे टाळण्यासाठी तयार केलेल्या जाहिरातींनाही सर्वात आधी ब्लॉक केले जाते.
वापरकर्त्यांनी कसे सतर्क राहावे?
जरी गुगल 99 टक्के जाहीराती ब्लॉक करत असले, तरी 1 टक्के खूप धोकादायक असू शकते. अतिशय मोहक ऑफर्स टाळा (उदा. 1000 मध्ये आयफोन). अज्ञात वेबसाइट्सवर बँक/ओटीपी माहिती देऊ नका.
यूआरएल आणि ब्रँडचे नाव काळजीपूर्वक तपासा. स्पॉन्सर्ड टॅगवर अवलंबून राहू नका.