For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सदिच्छा भेट

06:35 AM Dec 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
सदिच्छा भेट
Advertisement

गारठून टाकणाऱ्या थंडीत नागपुरात मंगळवारी उद्धव ठाकरे व त्यांच्या 20 आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि सभापती राहुल नार्वेकर यांची घेतलेली भेट ही सदिच्छा भेट म्हणून सांगितली जाते आहे. 12 तारखेला दिल्लीत अजित पवार यांनी शरद पवार यांचे दर्शन घेऊन त्यांना दिलेल्या शुभेच्छा यासुद्धा सदिच्छा मानल्या जात आहेत पण ‘एक तर तू राहशील किंवा मी’ अशी टोकाची कडवी भाषा आणि फडणवीसांच्या शपथविधीवर बहिष्कार टाकणारी मंडळी अचानक बदलतात तेव्हा काही ना काही गडबड असतेच असते. आग असली तरच धूर येतो, अगदी तसाच प्रकार या सदिच्छा भेटीत दिसून आला आहे. उद्धव ठाकरे हे सहजासहजी भूमिका बदलणारे नरम होणारे नेते नाहीत. देवेंद्र फडणवीस यांना जेथे जमेल तेथे कडव्या शब्दात लक्ष बनवणारे आणि त्यांचा फोनही न स्विकारणारे, शपथविधीवर बहिष्कार टाकणारे ठाकरे अचानक मुख्यमंत्री दालनात येऊन फडणवीस यांना शुभेच्छा देतात यामागे काय कारण असावे असा सर्वांना संभ्रम पडलेला आहे. बरं ही भेट होताच त्यांनी सावरकर यांच्या मुद्यावरून कॉंग्रेसला फटकारत मोदींनी सावरकरांना भारतरत्न जाहीर करावा अशी मागणीही केली आहे. उद्धव ठाकरे यांची ही चाल मूळपदावर येणेसाठी आहे की विरोधी पक्ष नेतेपद पदरात पाडून घेण्यासाठी आहे की ईडी वगैरे भीतीने आहे की राजकारणातील भाजपची ही चाल आहे, हे लगेच आताच स्पष्ट होणार नाही पण ‘कुछ तो गडबड है’. महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड बहुमत आहे. केंद्रात नरेंद्र मोदी सरकारला दोन टेकू आहेत. या पार्श्वभूमीवर झालेल्या भेटी केवळ शुभेच्छा, सदिच्छा म्हणता येणार नाही. शिवसेनेकडे 20 आमदार आहेत ‘तूम्ही फडणवीस तर आम्ही 20’ हा डायलॉग ठाकरेंनी मारलाय. भाजपकडे स्वत: व सहयोगी 143 आमदारबळ आहे तर शिवसेनेकडे 20 आमदार आणि 9 खासदार आहेत तीच गोष्ट राष्ट्रवादीची राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 10 आमदार आणि 8 खासदार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गट अजितदादा गटात विलीन व्हावा आणि ठाकरे शिवसेना गट एनडीएमध्ये सहभागी व्हावा यासाठी धोरणात्मक प्रयत्न दिसत आहेत. तसे झाले तर कॉंगेस एकाकी पडेल आणि केंद्रात व राज्यात भाजप सरकार अधिक सशक्त होईल, देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळ पूर्ण केले आहे पण एक मंत्रीपदाची जागा रिक्त ठेवली जाते तो सापळा आहे. फडणवीस यांनी सांगली जिह्यातील एकालाही मंत्रीपद दिलेले नाही. ओघानेच हा सापळा सांगलीत कुणासाठी तरी लावला असावा का? असा कयास बांधला जातो आहे पण पाण्यात बसलेली म्हैस उठत नाही तोवर खात्री देता येत नाही. पण फडणवीस व अजितदादा यांची भूमिका दडून राहिलेली नाही. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संवाद, सख्ख्य यामुळे एकनाथ शिंदे गट अस्वस्थ होऊ शकतो पण आता त्यामुळे महायुतीतील एकनाथ शिंदे वगैरेची अडवणूक भूमिका निवळेल हे वेगळे सांगायला नको. जोडीला भाजपला केंद्रात जे निर्णय घ्यायचे आहेत ते घेता येतील. महाराष्ट्रात मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप झाल्यावर सुरु झालेला तमाशा, छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार वगैरे मंडळींची नाराजी यामुळे महायुतीला उत्तम बहुमत आणि अनेकांना मंत्रीपदाची संधी मिळूनही नाराजीचे सत्र सुरुच आहे. नाराज मंडळी श•t मारताना दिसत आहेत. महाराष्ट्रात ओबीसीमध्ये ज्या जात दांडग्या जाती आहेत त्यामध्ये माळी जात आहे. आपण माळी आणि ओबीसीचे लढाऊ नेते आहोत अशी भुजबळ यांची भूमिका आहे. ते बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीतून तयार झालेले नेते आहेत. भाजपने दोन मंत्रीपदे माळी समाजाला दिली पण अजितदादांनी एकही पद न देता छगन भुजबळ यांना डावलले. त्यातूनच ‘कसला दादा कसला वादा’ म्हणत आणि जहाँ नही चैना... असे ट्विट करत भुजबळ यांनी नाराजीची तलवार उपसली आहे. वहाँ नही रेहना असे संकेत दिले आहेत. भुजबळ पंधरा आमदारांसह पक्ष सोडणार अशीही कुजबुज सुरु झाली आहे. ओघाने भाजप संधीवर आणि भक्कम बळावर लक्ष ठेवून आहे. इंडी आघाडीत नेतृत्व कुणाकडे यावरुन वाद आहे. विरोधी नेते पद आणि इंडी नेतृत्व एकाच व्यक्तीकडे नको. इंडी नेतृत्व ममता बॅनर्जी यांचेकडे द्या अशी मागणी होते आहे, कॉंग्रेसमध्ये ‘ना केंद्रात, ना राज्यात’ दोन्हीकडे सत्ता नाही. यामुळे तळमळ आहे. महाराष्ट्रातही महाआघाडीत कुरबुरी सुरु आहेत, हे सगळे लक्षात घेऊन ठाकरे व पवार यांची पावले पडताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनीही राजकीय संवाद, सहकार्य आणि चांगले वातावरण यासाठी पहिल्याच भाषणात अवाहन केले होते व हात पुढे केला होता. त्याला ठाकरेंनी टाळी दिली असेही या सदिच्छा भेटीबद्दल म्हणता येईल पण या निमित्ताने ठप्प संवाद आणि एकमेकांना संपवणे भाषा संपली असे म्हणता येईल. पण ठाकरे एकदा पंगा घेतला की काहीही होवो तो कायम राखतात, असा इतिहास आहे. या प्रकरणात काय होते ते बघावे लागेल. विधानसभा विरोधीपक्ष नेते पद कोणत्याही विरोधी पक्षाची संख्या 28 पेक्षा जास्त नाही. म्हणून कुणालाच मिळू शकत नाही. विधीमंडळात विरोधी पक्ष दुबळा झाला आहे असा दुबळा विरोध हा सदृढ लोकशाहीला मारक होतो व विरोधी भूमिका जनताच निभावते. त्यातून सतत अशांतता माजते, असे शास्त्र सांगते. म्हणून शिवसेनेला सदस्य संख्या नसली तरी विरोधी नेतेपद देण्याचे घाटत आहे. आदित्य ठाकरे किंवा अन्य विरोधी नेते होऊ शकतात. एकुणच देवेंद्र फडणवीस आस्ते चाल भविष्याचा वेध घेत पावले उचलत आहेत. राज्य सरकार दणकट आहेच. जोडीला केंद्र सरकार दणकट करण्यासाठी महाराष्ट्रातून हालचाली सुरु आहेत. पवार मंडळी कायम सत्तेचेच राजकारण करतात. शरद पवार पाच वर्षे सत्ता वंचित राहतील, यावर कुणाचा विश्वास नाही. त्यामुळे दादा-साहेब भेट आणि देवाभाऊ-उद्धवसाहेब भेट केवळ शुभेच्छा, सदिच्छा भेट नाही या दोन्ही भेटीत मोठे राजकारण दडलेले आहे, अनेक शक्यता दडलेल्या आहेत आणि अनेकांना यातून योग्य समजही प्राप्त झाली आहे. शेवटी राजकारणात सत्ता महत्त्वाची आणि सत्तेसाठी राजकारणात कोण कुणाचा कायमचा मित्र नसतो, कायमचा शत्रू नसतो हेही खरे.

Advertisement

Advertisement
Tags :

.