गोवा बनावटीच्या दारूसह साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त
खडेबाजार पोलिसांची कारवाई, एकाला अटक : टेम्पोत आढळला 7 लाख 30 हजार रुपयांचा दारूसाठा
बेळगाव : मालवाहू टेम्पोत गोवा बनावटीच्या दारूचा बेकायदेशीररित्या साठा केल्याप्रकरणी खडेबाजार पोलिसांनी एकाला मंगळवार दि. 11 रोजी अटक केली आहे. न्यू गुडस्शेड रोड येथे ही कारवाई करण्यात आली असून 7 लाख 30 हजार रुपये किमतीची दारू आणि 3 लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण 10 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राकेश अनिल चौगुले (वय 30, रा. न्यू गुडस्शेड रोड) असे त्याचे नाव आहे. न्यू गुडस्शेड रोडवर थांबलेल्या एका मालवाहू टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूचा साठा करण्यात आला आहे, अशी खात्रीलायक माहिती खडेबाजारचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी यांना मिळाली होती.
त्यानुसार त्यांनी ही माहिती पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, निरंजन राजे अरस आणि खडेबाजारचे साहाय्यक पोलीस आयुक्त शेखराप्पा एच. यांना दिली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद आदगोंड, त्यांचे सहकारी ए. बी. शेट्टी, बी. एस. रुद्रापूर, बी. एल. सर्वी, भरमाण्णा करेगार, संतोष बर्गी, सदाशिव हलगीमनी, चन्नाप्पा तेली, ए. एस. हेग्गण्णा यांनी सापळा रचून मंगळवारी सदर ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी केए 24, 9049 क्रमांकाच्या टेम्पोची झाडाझडती घेतली असता त्यामध्ये विविध कंपन्यांचे गोवा बनावटीचे मद्य आढळून आले. त्यानुसार 7 लाख 30 हजार रुपये किमतीची 670 लिटर दारू जप्त करण्यात आली. त्याचबरोबर 3 लाख रुपये किमतीचा मालवाहू टेम्पो असा एकूण 10 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.