1.17 कोटींचा मुद्देमाल जप्त, 14 जणांना अटक
विजापूर पोलिसांची कारवाई : 2 कार, 39 दुचाकी हस्तगत : विविध गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश
वार्ताहर/विजापूर
अवघ्या दोन दिवसांपूर्वी सायबर गुह्यांचा उलगडा करून कोट्यावधी रुपयांची रोख रक्कम जप्त करून ती संबंधितांना देण्यात आली असताना विजापूर पोलिसांनी पुन्हा विविध सोन्याच्या चोरी व दुचाकी चोरीच्या गुह्यांचा छडा लावण्यात यश मिळविले आहे. या कारवाईत त्यांनी सुमारे 1 कोटी 17 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून 14 जणांना अटक केली आहे. या कारवाईमुळे पोलिसांचे कौतूक होत आहे. विविध पोलीस स्थानकांच्या हद्दीत दाखल असलेल्या 48 सोने व दुचाकी चोरीच्या प्रकरणांशी संबंधित एकूण 14 आंतरराज्य व आंतरजिल्हा आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून अंदाजे 65 लाख रुपये किमतीचे 426.2 ग्रॅम सोन्याचे दागिने, 20 लाख रुपये रोख रक्कम, गुह्यासाठी वापरलेल्या 2 कार तसेच 39 दुचाकी जप्त केल्या आहेत. एकूण 1 कोटी 17 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या संदर्भात माहिती देताना जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी म्हणाले, गेल्या काही दिवसांत सुमारे 2 कोटी रुपये किमतीची रोख रक्कम व सोने विविध प्रकरणांमध्ये जप्त करून ती संबंधितांना परत देण्यात विभागाला यश आले आहे. 30 मे 2025 रोजी विजापूर-ताळिकोटे बसने प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या जवळील 65 ग्रॅम सोन्याचे दागिने मनगुळी जवळ चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा उलगडा करत पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रशांत वेंकटेश भोयर, अंकुश साहेबराव जाधव, गोवर्धन विठ्ठल पवार, रजनी शिवू भोवी, मंजू प्रशांत भोयर, शिवू राजन्ना भोवी यांचा समावेश आहे. मनगुळी, तिकोटा, देवरहिप्परगी, बबलश्वेर, आदर्शनगर, गोलघुमट व निडगुंदी पोलीस स्थानकाशी संबंधित एकूण 8 प्रकरणांमध्ये वापरलेली 1 कार आणि 426.2 ग्रॅम सोन्याचे दागिने, असा सुमारे 65 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
विशेष तपास पथकाने मुळवाड क्रॉसजवळ संशयास्पदरीत्या कारमधून जाणाऱ्या आरोपींना ओळखले. कार थांबवण्याचा इशारा देऊनही त्यांनी न थांबल्याने पोलिसांनी पाठलाग करून आरोपींना अटक केली. खरे सोन्याचे नाणे असल्याचे भासवून लाखो रुपये उकळणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली. मनगुळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षी 8 मे रोजी हे प्रकरण दाखल झाले होते. आरोपींनी बनावट सोन्याची नाणी खरी असल्याचे भासवून तक्रारदाराकडून 26 लाख रुपये घेत फसवणूक केली होती. या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी विजयनगर येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून 20 लाख रुपये रोख रक्कम व गुन्ह्यासाठी वापरलेली एक कार जप्त करण्यात आली आहे.