For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

1.60 कोटींचा ऐवज जप्त : 43 आरोपींना अटक

01:07 PM Apr 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
1 60 कोटींचा ऐवज जप्त   43 आरोपींना अटक
Advertisement

विजापूर जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांची पत्रकार परिषदेत माहिती

Advertisement

वार्ताहर/विजापूर

जिल्हा पोलीस विभागाने शहरातील विविध पोलीस स्थानकांच्या हद्दीत गतवर्षी, तसेच चालू वर्षात नोंद झालेल्या चोरी प्रकरणांबाबत एकूण 30 प्रकरणांमध्ये 43 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे 1 कोटी 60 लाख 32 हजार रुपयांच्या सोन्या-चांदीसह वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी दिली. शहरातील एसपी कार्यालयाच्या परिसरातील समुदाय भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, 2025 साली गोलघुमट पोलीस स्थानकात नोंद झालेल्या 6 चोरी प्रकरणांत 6 आरोपींना अटक करण्यात आली होती. तसेच चालू वर्षात नोंद झालेल्या एका प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली. एकूण 33 लाख 2 हजार रुपयांपैकी 15 लाख रुपये किमतीचे 100 ग्रॅम 60 गुंज सोन्याचे दागिने, 2 हजार रुपये किमतीचे 10 ग्रॅम चांदीचे कडे, तसेच 18 लाख रुपये किमतीची इनोव्हा क्रिस्टा कार जप्त करण्यात आली.

Advertisement

10 चोरी प्रकरणांमध्ये 21 आरोपींना अटक

2025 साली आर्षनगर पोलीस स्थानकात नोंद झालेल्या 10 चोरी प्रकरणांत 21 आरोपींना अटक करून एकूण 74 लाख 55 हजार रुपयांपैकी 61 लाख 50 हजार रुपये किमतीचे 410 ग्रॅम सोन्याचे दागिने, 1 लाख 50 हजार रुपये किमतीच्या 2 दुचाकी, 5 लाख रुपये किमतीची ह्युंदाई कंपनीची कार आणि 6 लाख 55 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. जलनगर पोलीस स्थानकात 2025 साली नोंद झालेल्या एका चोरी प्रकरणात 2 आरोपींना, तसेच चालू वर्षातील 3 प्रकरणांत 4 आरोपींना अटक करण्यात आली. एकूण 6 लाख 30 हजार रुपयांपैकी 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे 10 ग्रॅम सोन्याचे दागिने, 60 हजार रुपये किमतीचे 250 ग्रॅम चांदीचे दागिने व 4 लाख 20 हजार रुपये किमतीच्या 7 दुचाकी जप्त करण्यात आल्या.

2 चोरी प्रकरणांत 3 आरोपींना अटक

तसेच शहरातील एपीएमसी पोलीस स्थानकात चालू वर्षात नोंद झालेल्या 2 चोरी प्रकरणांत 3 आरोपींना अटक करून 14 लाख 40 हजार रुपये किमतीचे 90 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 4 लाख 80 हजार रुपये किमतीची टेरेनो प्लस कार यांसह एकूण 19 लाख 20 हजार रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. यावेळी संबंधित पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरीस गेलेल्या मौल्यवान वस्तू त्यांच्या मालकांना परत करण्यात आल्या. सदर चोरी प्रकरणे उघडकीस आणण्यासाठी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक रामनगौडा हत्ती, विजापूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी नागराज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली गोलघुमट सर्कलचे सीपीआय एस. एस. बलिगार, गांधीचौकचे पीआय प्रदीप तलकेरी यांच्या नेतृत्वाखाली गांधीचौक, गोलघुमट, एपीएमसी, आर्शनगर आणि जलनगर पोलीस स्थानकाच्या कर्मचाऱ्यांचे तपास पथक स्थापन करण्यात आले होते.

7 चोरी प्रकरणांत 6 आरोपींना अटक

गांधी चौक पोलीस स्थानकात नोंद झालेल्या 7 चोरी प्रकरणांत 6 आरोपींना अटक करून एकूण 27 लाख 25 हजार रुपयांपैकी 10 लाख 50 हजार रु. किमतीचे 70 ग्रॅम सोन्याचे दागिने, 15 लाख 42 हजार रु. किमतीच्या 18 दुचाकी, 1 लाख 10 हजार रुपये रोख, 13 हजार रुपये किमतीचा 1 लॅपटॉप  जप्त करण्यात आला.

Advertisement
Tags :

.