बेळगावात मालवाहू रेल्वेचे डबे रुळावरून घसरले
तब्बल पाच तास रेल्वे वाहतूक ठप्प : हुबळी-मिरज दरम्यान वाहतूक खोळंबली, प्रवाशांची प्रचंड गैरसोय, डबे हलविण्याचे काम युद्धपातळीवर
बेळगाव : जेएसडब्ल्यू मालवाहू रेल्वे हुबळीहून बेळगावच्या दिशेने येत होती. सकाळी 7.27 च्या सुमारास बेळगावच्या मिलिटरी महादेव परिसरात मालवाहू रेल्वेचे दोन डबे रेल्वे रुळावरून घसरले. यापैकी एक डबा थेट दुसऱ्या रेल्वे रुळावर घसरला. यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. यामध्ये रेल्वे रुळाचेही मोठे नुकसान झाले. तात्काळ हुबळी येथील यंत्रसामुग्री बेळगावला आणून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. क्रेनच्या साहाय्याने रेल्वे डबा बाजूला करून दुपारी 2 च्या सुमारास एका ट्रॅकवरून रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात आली.
प्रवाशांची प्रचंड गैरसोय
याचदरम्यान मुंबईहून बेळगावच्या दिशेने येणारी हुबळी एक्स्प्रेस सुळेभावी रेल्वे स्थानकात तब्बल पाच तास थांबविण्यात आली. मुंबईहून बेळगावला येऊन इतर कामे करण्याच्या नियोजनामध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना यामुळे मोठा फटका बसला. त्याचबरोबर चन्नम्मा एक्स्प्रेसदेखील पाच तास लोंढा रेल्वेस्थानकात थांबविण्यात आली होती. यामुळे लहान मुलांसह वयोवृद्धांचे हाल झाले. सुळेभावीसारख्या लहान रेल्वेस्थानकात खाण्या-पिण्याच्या सोयी उपलब्ध नसल्याने झालेल्या गैरसोयीबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
नैर्त्रुत्य रेल्वेचे डीआरएम तात्काळ दाखल
मिरज-हुबळी या मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने नैर्त्रुत्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. नैर्त्रुत्य रेल्वेच्या हुबळी विभागीय अधिकारी बेला मीना यांनी घटनास्थळी भेट देऊन मालवाहू रेल्वेचा डबा हलवेपर्यंत कामाचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत इंजिनिअरिंग, इन्फ्रास्ट्रक्चर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शहरालगत मालवाहू रेल्वेचे डबे घसरल्याने ते पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होत होती. त्यांना हटविण्यासाठी रेल्वे पोलिसांना मेहनत घ्यावी लागली.
काही रेल्वेंच्या मार्गात बदल
बेळगाव-मिरज रेल्वे मंगळवारी घटप्रभा ते बेळगावदरम्यान रद्द करण्यात आली. ही एक्स्प्रेस घटप्रभा-मिरज दरम्यान धावत होती. त्याचबरोबर बेळगाव-म्हैसूर एक्स्प्रेसदेखील मंगळवारी सायंकाळी 6 ऐवजी रात्री 11 वाजता म्हैसूरच्या दिशेने रवाना झाली. लोंढा-मिरज एक्स्प्रेस देसूर रेल्वेस्थानकात थांबविण्यात आली. म्हैसूर -बेळगाव एक्स्प्रेस खानापूर येथे, बेंगळूर-सांगली (राणी चन्नम्मा एक्स्प्रेस) लोंढा येथे, बेंगळूर-जोधपूर एक्स्प्रेस देवराई येथे, तिरुपती-कोल्हापूर एक्स्प्रेस हुबळी येथे, अजमेर-बेंगळूर एक्स्प्रेस रायबाग येथे, मिरज-हुबळी एक्स्प्रेस कुडची येथे, दादर-पाँडिचेरी एक्स्प्रेस घटप्रभा येथे तर दादर-हुबळी एक्स्प्रेस सुळेभावी रेल्वेस्थानकात थांबविण्यात आली होती.
प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक यंत्रणा उभारली
मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचे दोन डबे मंगळवारी सकाळच्या सुमारास बेळगाव रेल्वेस्थानकाजवळ घसरले. यामुळे हुबळीहून मिरजला व मिरजहून हुबळीला जाणाऱ्या रेल्वे खोळंबल्या. प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यात आली. त्याचबरोबर रेल्वेमार्ग मोकळा करण्यासाठी आवश्यक यंत्र सामुग्री हुबळी येथून पुरविण्यात आली.
-डॉ. मंजुनाथ कनमाडी, जनसंपर्क अधिकारी नैर्त्रुत्य रेल्वे