Healthy Food | सरकारी बैठकीत चहा-बिस्किटांना बाय-बाय! आता इडली-सांबारसोबत फळांची मेजवानी
मुंबई -शासकीय व निमशासकीय बैठका, शासकीय कार्यक्रमात आता इडली सांबार सोबतच केळी, पेरू, सफरचंद आदी फळांची रेलचेल दिसणार आहे. अशा सरकारी कार्यक्रमात तसेच कार्यालयांतील उपहारगृहांमध्ये आरोग्यदायी अल्पोपहार आणि जेवण उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात येणार आहे.
संबंधित कार्यालयांच्या नव्या खानपान करारांमध्ये आरोग्यदायी मेनूचा समावेश करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे समोर आले आहे.
पोषक आहाराच्या सवयीसाठी
शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली आणिपोषक आहाराची सवय रुजावी, या उद्देशाने सर्व शासकीय विभागांना या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. त्यानुसार अल्पोपहारामध्ये तेलकट तसेच अतिप्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचे प्रमाण कमी करून पौष्टिक, स्थानिक आणि पारंपरिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
मंत्रालयात याआधीच सुरुवात
मंत्रालयातील उपहारगृहांमध्ये या दिशेने यापूर्वीच सुरुवात करण्यात आली आहे. येथे हंगामी फळे, उकडलेली अंडी, उकडलेले कडधान्य, पोहे, इडली सांबार, गरम दूध आणि साखरविरहित ग्रीन टी यांसारखे आरोग्यदायी पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर जेवणामध्ये डाळ, उसळ, पालेभाज्या, ताक, कोशिंबीर, विविध भाज्या आणि संतुलित धान्यांचा समावेशकरण्यावर भर दिला जात आहे. खास करुन महाराष्ट्रीय ग्रामीण पद्धतीचे आणि आरोग्यदायी जेवण प्रचिलीत व्हावे, असा या निर्णया मागचा उद्देश असल्याचेही सांगण्यात आले आहे.
नाचणी, ज्वारी - बाजरीच्या भाकरीलाही पसंती
आरोग्यदायी मेनूमध्ये हंगामी फळांसह केळी, सफरचंद, पेरू, पपई यांचा समावेश असेल, उकडलेली अंडी, उकडलेले कडधान्य, पोहे, इडली-सांबार, मागणीनुसार गरम दूध आणि साखरविरहित ग्रीन टी हे अल्पोपहाराचे प्रमुख पर्याय असतील, याशिवाय नाचणीची भाकरी, ज्वारी-बाजरीची भाकरी, ताक, कोशिंबीर, विविध भाज्या, डाळी आणि उसळी यांना प्राधान्य दिले जाणार आहे, त्यामुळे शासकीय बैठकांमधील पारंपरिक चहा-बिस्किटांच्या जोडीला आता आरोग्यदायी खाद्यपदार्थांची मेजवानी पाहायला मिळणार आहे.