अलविदा अजितदादा! राजकारणातील 'अजित' अनंतात विलीन
दादांना अखेरचा निरोप देताना महाराष्ट्र हळहळला
बारामती : राज्याच्या राजकारणात अनेकदा धक्कातंत्राचा प्रत्यय देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी विमान अपघातात निधन झाले. अजित पवार यांची अकाली एक्झिट अवघ्या महाराष्ट्रासाठी धक्कादायक ठरली. वक्तशीर, बोलण्यात कडक पण तितकाच मिश्कील असलेला ‘दादा माणूस’ अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवार, २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार आले . तत्पूर्वी सकाळी ९ वाजता त्यांची अंत्ययात्रा निघाली.
अजित पवारांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. काटेवाडी ते बारामती असा त्यांचा अखेरचा प्रवास पहाटेपासून सुरू झाला असून, यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी लाखो लोक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. दादा नावाने लोकप्रिय असलेले अजित पवार त्यांच्या कठोर परिश्रमासाठी आणि पहाटेपासून कामाला लागण्याच्या सवयीसाठी ओळखले जात होते.
अजित दादांच्या निधनामुळे फक्त बारामतीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र दुःखात बुडालेला पाहायला मिळाला. लाडक्या नेत्याला शेवटचे पाहण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि हजारो युवक तासनतास रांगेत उभे होते. केवळ एक राजकारणी म्हणून नव्हे, तर कामाचा डोंगर उभा करणारा आपला हक्काचा माणूस गेला, अशी भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना अश्रू अनावर झाले होते.
अजित दादांचे पार्थिव आज सकाळी त्यांच्या सहयोग या निवासस्थानी आणि त्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तिथून फुलांनी सजवलेल्या ट्रकमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले हजारो कार्यकर्ते दादा अमर रहे अशा घोषणा देत आपल्या नेत्याला निरोप देत होते.
बारामतीमधील प्रत्येक घर आणि प्रत्येक रस्ता सुन्न झालेला पहायला मिळाला. या दुःखाच्या प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंबातील थोरली लेक म्हणून सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतल्याचे पाहायला मिळाले. आपल्या लाडक्या भावाच्या जाण्याने कोसळलेले दुःख बाजूला सारून त्यांनी अंत्यसंस्काराच्या सर्व नियोजनात स्वतःला झोकून दिले होते. पार्थिवाच्या दर्शनापासून ते अखेरच्या विधींपर्यंत त्या सर्व ठिकाणी खंबीरपणे उभ्या राहिल्या. कुटुंबाला आणि कार्यकर्त्यांना आधार देण्याचे काम त्यांनी आज केले.
अजित पवार यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशभरातील अनेक महत्त्वपूर्ण राजकीय मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राबाहेरील खासदार कृष्णाजी देवरायू, महसूल मंत्री प्रसाद आणि खासदार सी.एम. रमेश, श्रीनिवास रेड्डी यांसारख्या नेत्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.
महाराष्ट्रातून मंत्री रक्षा खडसे, माधुरी मिसाळ, नीलम गोरे, अदिती तटकरे, वनमंत्री गणेश नाईक, पंकजा मुंडे, तसेच माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शशिकांत शिंदे हे उपस्थित होते. याप्रसंगी, दादा यांनी दिलेल्या शिस्तीच्या मूलमंत्राचे पालन करण्याचे आवाहन उपस्थितांना करण्यात आले