शुभशकुन की अपशकुन?
आता पुढील उपराष्ट्रपती कोण होणार? याबाबत उलटसुलट तर्कवितर्क भलेही केले जात असोत. पण जगदीप धनखड यांनी वादळी ठरू पाहणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच राजीनामा देऊन राजकर्त्यांकरता अजून एक वादळ निर्माण केलेले आहे. सध्या राज्यकर्त्यांचे उच्चीचे ग्रह नाहीत. पुढील भाजप अध्यक्ष कोण असावा याबाबत जोरदार रस्सीखेच सुरु असतानाच धनखड प्रकरण अचानक घडल्याने सत्ताधारी गोटात खरोखरी चालले आहे तरी काय? अशा शंका आल्या तर नवल ठरणार नाही. दुष्काळात तेरावा महिना या न्यायाने चंद्राबाबू नायडू यांनी निवडणूक आयोगाच्या बिहारमधील स्पेशल इंटेन्सिव्ह रिविजन विरूद्ध आवाज उठवून केंद्राला अगोदरच अडचणीत आणले होते.
ज्या तडकाफडकीने धनखड यांनी राजीनामा दिला त्यामागे मोठेच गौडबंगाल आहे. धनखड यांना राजीनामा द्यायला सांगितला गेला आणि त्यांच्यापुढे तो देण्याशिवाय काही पर्यायच उरला नाही असे चित्र दिसत आहे. उपराष्ट्रपती बनल्यापासून धनखड यांनी वादग्रस्त विधाने आणि कृती करून संसदेतील आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ‘हनुमान’च आहोत असे भासवण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला. त्याने मोदींना जरूर लाभ झाला खरा पण धनखड यांची मात्र जगात शोभा झाली.
मोदी पंतप्रधान होऊन 11 वर्षे झाली त्यात हा अशा तऱ्हेने आलेला पहिलाच राजीनामा होय. धनखड हे ज्या पद्धतीने गेले त्याने पंतप्रधान जातीने हादरले असे दिसले. ज्या पद्धतीने पंतप्रधानांनी समाजमाध्यमावर धनखड यांना आरोग्य चिंतले त्यावरूनच त्यांचे आणि उपराष्ट्रपतींचे बराच काळ बिनसले होते असे प्रतीत झाले. आपण संघाचे खास असा त्यांनी कितीही गवगवा केला असला तरी उपराष्ट्रपती म्हणून धनखड हे पंतप्रधानांचीच खास निवड होते हे कोणाच्या नजरेपासून लपून राहिले नाही. पश्चिम बंगालचे राज्यपाल या नात्याने त्यांनी ममता बॅनर्जी यांना ज्या रीतीने सळो की पळो करायला लावले त्यावरून धनखड यांनी आपली स्वामीभक्ती दाखवली होती.
म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो, या न्यायाने धनखड यांची कृती ही मोदी सरकारला अडचणीची ठरणार असे मानले तर ते चुकीचे ठरणार नाही. सरकारमधून अजूनही काही राजीनामे होणार आहेत अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राज्यकर्त्यांना अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ‘प्रथमग्रासे मक्षिकापात: झाला कारणाने विरोधक खुश आहेत. धनखड यांच्या गच्छन्तीने कोणीच रडणार नाही. त्यांनी सत्ताधारी वर्तुळात देखील आपले मित्र बनवले नव्हते. पंतप्रधानच साक्षात आपल्या बरोबर आहेत तर आपल्याला कोणाची काय तमा? अशीच त्यांची धारणा होती. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला त्यांना आपले प्रतिस्पर्धी वाटत होते. अतिशय महत्वाकांक्षी असलेल्या धनखड यांची नजर पुढील राष्ट्रपती बनण्याकडे होती हे कोणाच्या नजरेतून लपून राहिलेले नव्हते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कधी निवृत्त होणार आणि आपण त्यांच्या जागी कधी बसणार अशी स्वप्ने धनखड दिवसरात्र बघायचे असे त्यांच्या एकंदर वागण्यातून दिसून येत होते. येनकेनप्रकारेण आपल्या नेत्याला कसे खुश करायचे हे ते बघत होते. राज्यसभेचे सभापती या नात्याने विरोधी पक्षातील जवळजवळ सर्वच खासदारांना निलंबीत करण्याचा उफराटा विक्रम देखील त्यांनी केला होता.
भाजप आणि सरकारमधील निर्णय ज्या रीतीने घेतले जातात ते बघितले असता साक्षात पंतप्रधान निर्णय घेतात आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे काम गृहमंत्री अमित शहा हे करतात. जर मोदींनीच धनखड यांना राजीनामा द्यायला सांगितला असेल तर काहीतरी अब्रह्मण्यम नक्कीच घडले असणार. स्मशानात गवऱ्या गेल्या तरी नेतेमंडळी खुर्ची सोडत नसतात असा एकंदरीत अनुभव असताना धनखड यांच्यासारखा पंतप्रधानांचा स्तुतिपाठक अशा रितीने उगीचच एक्सिट करेल असे संभवत नाही. खुर्ची सोडणे हे धनखड यांच्या डीएनएमध्ये नाही. मी अजून दोन वर्षे उपराष्ट्रपती म्हणून राहणार आहे, असे त्यांनी गेल्या महिन्यातच सांगितले होते.
त्यांच्या या अचानक राजीनामा नाट्यावर सत्ताधारी पक्षाकडून फारसे सांगितले न गेल्याने त्यामागील रहस्य अजूनच वाढलेले आहे. धनखड यांना साधा निरोप समारंभ देण्याचा देखील राज्यकर्त्यांचा विचार नाही यावरून दोन्ही बाजूत किती कटुता आली आहे असे साफ दिसून येत आहे. धनखड प्रकरण ज्या प्रकारे घडले आहे त्याने एक संदेश मात्र जरूर गेलेला आहे तो म्हणजे मोदी-शहा यांचा भरवसा कोणावरून उठला त्याचे पुढे काही खरे नाही. या अधिवेशनात धनखड यांच्याविरोधात अजून एक अविश्वास प्रस्ताव आणण्याचा डाव विरोधी पक्ष खेळणार आहेत, अशी पुडी देखील सोडण्यात आलेली होती. संसद टीव्ही या चॅनलचे राज्यसभा सभापती या नात्याने धनखड हे सर्वेसर्वा होते. तेथील कर्मचारी वर्ग त्यांना मिळणाऱ्या वागणूकीविरोधात नुकताच न्यायालयात गेलेला आहे. या चॅनेलमधील 150 कर्मचाऱ्यांना नारळ देऊन त्यांच्याजागी आपली खास माणसे आणण्याचा धनखड यांचा मानस होता अशी वृत्ते होती. अमित शहा यांची नाराजी धनखड यांना भोवली असेही सांगितले जाते.
सर्वोच्च न्यायालयाच्या काही न्यायमूर्तींनी सरकारकडे धनखड यांच्या बेछूट वक्तव्या बाबत तक्रार केली होती आणि त्यांना लगाम घाला अशी विनंती केली होती. त्यातच ते जस्टीस यशवंत वर्मा यांच्यावर महाभियोग चालवण्याबाबत अतिशय आग्रही दिसत होते. अरुण जेटली हे राज्यसभेचे नेते असतानाच शहा हे सरकारात आले होते. त्याकाळी शहा हेच राज्यसभा चालवावयाचे आणि पंतप्रधानांचे खासमखास असूनदेखील जेटली यांना गप्प बसावे लागावयाचे हे तेव्हा प्रकर्षाने सभागृहात दिसून यायचे.
धनखड राजीनामा काय दाखवतो?
कारण काहीही असूदे, पण धनखड यांचा राजीनामा मोदी 3.0 सरकारातील सूत्रे सूटत चालली आहेत असेच दाखवतो. जर साक्षात मोदींनी आपणहून निवडलेला धनखड यांच्यासारखा नेता उसळी मारू लागला याचा अर्थ आत किती दडपण वाढलेले आहे असा होतो. एका भाजपच्या नेत्याने जणू एक तत्त्वज्ञानच सांगितले: ‘मोदींमुळे आम्हाला सत्ता मिळाली आहे. त्यामुळे ती घालवण्याचा अधिकार केवळ त्यांनाच आहे.’ त्यामुळे ते काय करतात ते करू दिले पाहिजे. इतरांनी जास्त प्रश्न विचारायचे काम नाही.
कोंबडा आरवला नाही तर दिवसच उजाडणार नाही या भाबड्या भ्रमात राहून संसदेत विरोधकांची मुस्कटदाबी सरकारला अजूनच अडचणीत आणत आहे. धनखड यांच्या राजीनाम्याने एकीकडे राज्यकर्ते अडचणीत आलेले आहेत तर दुसरीकडे विरोधकांची चांदी झाली आहे. गैरभाजप पक्षांना सभागृहात बोलू न देण्याचा विडा उचललेले धनखड एकीकडे कापराप्रमाणे उडून गेलेले आहेत तर त्यांच्या जागी कोण येणार यासाठी निवडणूक होणार त्यात विरोधक भाजपशी मुकाबला करणार आहेत.
धनखड यांचा उत्तराधिकारी हा जे पी नड्डा अथवा राजनाथ सिंग यांच्यासारखा ‘होयबा’ च असू शकतो, असे मानण्यास वाव आहे. उदभवलेल्या परिस्थितीत नवीन प्रयोग संभवत नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालेली आहे. माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि असंतुष्ट काँग्रेस नेते शशी थरूर यांची नावेदेखील घेतली जात असली तरी दुधाने तोंड पोळलेले सत्ताधारी ताक देखील फुंकून-फुंकून पिणार अशी सध्याची अवस्था आहे.
अगोदरच भाजपचा अध्यक्ष कोण असावा? यावर मोदी-शहा आणि संघामध्ये एक रस्सीखेच सुरु असतानाच धनखड प्रकरण आलेले आहे. हे अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच नवीन भाजप अध्यक्षाची घोषणा होईल असे संकेत सरकारातील उच्च पदस्थांनी देऊनदेखील काहीही घडले नसल्याने चांगलेच काहीतरी बिनसले आहे असा समज वाढीस लागलेला आहे. मोदी-शहा हे याबाबत एव्हढे हतबल का झाले आहेत अशी कुजबुज पक्षात ऐकू येत आहे. पंतप्रधानांचे घोर विरोधी समजले जाणारे संजय जोशी हे अचानक सक्रिय झाल्याचे सांगितले जात आहे. येत्या आठवड्यात संसद सक्रिय होणार आहे कारण ऑपेरेशन सिंदूर वरील चर्चेत गेल्या दोन-तीन महिन्यातील सारेच कडू-गोड पुढे येणार आहे. सरकारसाठी कसोटीचा काळ आहे. विरोधक सज्ज आहेत.
सुनील गाताडे