For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! आंबोलीतील 'ट्रॅफिक जॅम'वर सापडला रामबाण उपाय; चालू हंगामाच्या अखेरीस प्रायोगिक तत्वावर चाचणी शक्य

09:39 AM Sep 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
पर्यटकांसाठी महत्वाची बातमी  आंबोलीतील  ट्रॅफिक जॅम वर सापडला रामबाण उपाय  चालू हंगामाच्या अखेरीस प्रायोगिक तत्वावर चाचणी शक्य
Advertisement

शेखर सामंत

Advertisement

सिंधुदुर्ग: जैवविविधतेने समृद्ध असलेल्या पश्चिम घाटातील महत्त्वाचा जैवविविधता हॉटस्पॉट आणि मान्सून पर्यटनाचे प्रमुख आकर्षण म्हणून आंबोली घाटाची देशभरात ओळख आहे. पावसाळा सुरू झाला की धबधबे, दऱ्या-खोऱ्यांमधून कोसळणारे जलप्रपात आणि हिरवाईचा निसर्ग अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक आंबोलीकडे धाव घेतात. मात्र, या वाढत्या पर्यटनाला गेल्या काही वर्षांपासून ट्रॅफिक जॅमसारख्या गंभीर समस्येने अक्षरशः 'ब्रेक' लावला आहे.

शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी आंबोली घाटातील रस्ते पर्यटकांच्या वाहनांनी अक्षरशः फुलून जातात. अरुंद घाटरस्ता, रस्त्याच्या दुतर्फा होणारे बेशिस्त पार्किंग, धबधब्यांच्या ठिकाणी वाहन चालकांची गर्दी, वाहतुकीचे नियम न पाळणे आणि काही पर्यटकांकडून मद्यपान करून वाहन चालविण्याचे प्रकार यामुळे काहीवेळा वाहतूक तीन-चार तास ठप्प होण्याची वेळ येते. पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या वाट्याला निसर्गसौंदर्यापेक्षा मनस्तापच अधिक येतो.

Advertisement

कास पठाराच्या धर्तीवर आंबोलीत प्रयोग
गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनासमोर असलेल्या या प्रश्नावर आता एक नियोजनबद्ध उपाय पुढे येत आहे. साताऱ्याच्या कास पठारावर गर्दी आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी ज्या पद्धतीचे नियोजन करण्यात आले, त्याच धर्तीवर आंबोलीतील मान्सून पर्यटनाचे नियोजन करण्याच्या दृष्टीने वनखाते आणि स्थानिक महसूल प्रशासनाने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

धबधब्यापासून दोन्ही बाजूंना ५०० मीटर 'नो-स्टॉप झोन'!
मुख्य धबधब्याच्या परिसरापासून दोन्ही बाजूंना सुमारे ५०० मीटर अंतराचा 'नो-स्टॉप झोन' निश्चित करण्याचा प्रस्ताव आहे. या परिसरात कोणत्याही पर्यटकाला वाहन थांबवता किंवा पार्क करता येणार नाही. हा नियम केवळ कागदावर न राहता अत्यंत कडकपणे लागू करण्याचे नियोजन आहे. यामुळे धबधब्यांच्या परिसरात होणारी वाहनांची गर्दी आणि अचानक निर्माण होणारे ट्रॅफिक ब्लॉक्ज मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची अपेक्षा आहे.

घाट रस्त्यावर पार्किंग नाही; एमटीडीसीच्या जागेत पार्किंग
संपूर्ण घाटरस्त्यावर ठिकठिकाणी वाहने उभी करण्याऐवजी आंबोली एमटीडीसीच्या बाजारपेठेजवळील जागेचा पार्किंगसाठी वापर करण्याचे नियोजन आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने वाहने सामावून घेण्याची क्षमता उपलब्ध होऊ शकते. पर्यटकांनी आपली वाहने निर्धारित पार्किंगमध्येच उभी करायची आणि त्यानंतर पुढील प्रवासासाठी नियोजित शटल वाहनांचा वापर करायचा, अशी संकल्पना आहे.

वनखात्याच्या शटलमधूनच धबधब्यापर्यंत प्रवास
या व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पार्किंगपासून मुख्य धबधब्याच्या परिसरापर्यंत वनखात्याच्या नियोजित टेम्पो ट्रॅव्हलर किंवा शटल वाहनांमधून पर्यटकांना नेण्या-आणण्याची व्यवस्था प्रस्तावित आहे. यामुळे प्रत्येक पर्यटकाचे वाहन घबधब्याच्या ठिकाणी जाण्याची गरज राहणार नाही. परिणामी घाटातील वाहनांची संख्या आणि धबधब्याच्या परिसरातील गर्दी दोन्ही कमी होतील. ही संपूर्ण व्यवस्था 'पे अँड पार्क' तत्त्वावर राबविण्याचा वनखाते विचार करत आहे.

ड्रंक अँड ड्राइव्हवरही कठोर कारवाई
वाहतूक व्यवस्थेसोबतच आंबोलीच्या पर्यटनाला शिस्त लावण्यासाठी पोलीस आणि वनखाते संयुक्तपणे कारवाई करणार आहेत. मद्यपान करून वाहन चालविणारे वाहन चालक, रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणारे पर्यटक आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारण पर्यटन म्हणजे स्वैराचार नव्हे. निसर्गाचा आनंद घेताना इतर पर्यटकांच्या सुरक्षिततेचा आणि स्थानिकांच्या सोयीचा विचार करणेही तितकेच आवश्यक आहे.

स्थानिकांचा विरोध नव्हे, सहकार्य हवे

या नियोजनाला स्थानिक ग्रामस्थ, व्यावसायिक आणि ग्रामपंचायतींचा सकारात्मक प्रतिसाद मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळते, हे निर्विवाद आहे. मात्र पर्यटनामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांकडे दुर्लक्ष करणेही योग्य ठरणार नाही.

Advertisement
Tags :

.