DajipurSanctuary | पर्यटकांसाठी गूड न्यूज! दाजीपूर अभयारण्य उद्यापासून पर्यटनासाठी पुन्हा खुले
राधानगरी–दाजीपूर अभयारण्यात पर्यटन पुन्हा सुरू
राधानगरी - दाजीपूर अभयारण्य गेल्या पंधरा दिवसांपासून अंतर्गत रस्ता दुरुस्तीसाठी पर्यटन पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. अभयारण्यात जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला होता.दरम्यान, संबंधित रस्त्याची दुरुस्तीची कामे आता पूर्ण झाली असून उद्या दि,८ एप्रिलपासून पुन्हा पर्यटन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांनी दिली आहे.
पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्याची दुरुस्ती अत्यावश्यक होती. आता रस्ता सुरळीत झाल्याने पर्यटकांना अभयारण्यात प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे निसर्गप्रेमी आणि पर्यटकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
दाजीपूर अभयारण्य हे वन्यजीव, विशेषतः गवे आणि समृद्ध जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. पर्यटन पुन्हा सुरू झाल्याने स्थानिक व्यावसायिकांनाही मोठा दिलासा मिळणार असून येत्या काळात पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.