‘गृहज्योती’चा लाभ घेणाऱ्यांना खूशखबर
सरासरीच्या 10 टक्के ऐवजी 10 युनिट अधिक वीज वापरण्याची मुभा
बेंगळूर ; मोफत वीजपुरवठा करण्यासाठी जारी करण्यात आलेल्या ‘गृहज्योती’ योजनेच्या नियमात महत्त्वाचा बदल केला आहे. गृहज्योती योजनेचा लाभ देण्यासाठी सरकारने ग्राहकाला त्याने वापरलेल्या विजेची वार्षिक सरासरी अधिक 10 टक्के असे मिळून मोफत वीज देण्याचे निकष ठरविले होते. आता 10 टक्के हा निकष काढून टाकण्यात आला असून त्याऐवजी 10 युनिट असा बदल करण्यात आला आहे. 48 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांनाच (एलटी-2) हा बदल लागू आहे. गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ऊर्जामंत्री के. जे. जॉर्ज यांनी याविषयी माहिती दिली. गृहज्योती योजनेंतर्गत 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार वार्षिक सरासरीवर 10 टक्के अधिक वीज वापरण्यास ग्राहकाला मुभा देण्यात आली होती. केवळ 20, 30, 40 युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांना 10 टक्के अधिक वीज दिली तरी ती कमी प्रमाणात आहे. त्यामुळे 48 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना 10 टक्के ऐवजी 10 युनिट अधिक वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुढील महिन्यातील बिलातच 10 युनिट अधिक मोफत वीज देण्याची तरतूद केली जाईल. यामुळे राज्य सरकारवर वर्षाला 500 कोटी रुपयांचा अधिक भार पडणार आहे. तसेच कर्नाटक वीज निगमने घेतलेल्या 4,450 कोटी रुपये शुल्काला सरकारी हमी देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून घेतलेल्या कर्जाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे वीज पुरवठा महामंडळाने हमी देण्याची विनंती केली होती. त्यामुळे सरकारने आता 4,450 कोटी रु. कर्जावर हमी देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मंत्री के. जे. जॉर्ज यांनी दिली.