राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर; महागाई भत्त्यात 3.75 टक्क्यांनी वाढ
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3.75 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे महागाई भत्त्याचे प्रमाण 38.75 टक्क्यांवरून 42.50 टक्क्यांवर पोहोचले आहे. 1 जानेवारी 2024 पासून लागू होईल, या प्रमाणे हा भत्तावाढ जारी करण्यात आला आहे.
मागील आठवड्यात केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केली होती. त्यामुळे काही दिवसांपूर्वी राज्य कर्मचारी संघटनेने राज्य सरकारकडे 4 टक्के भत्तावाढीची मागणी केली होती. याची दखल राज्य सरकारनेही आपल्या कर्मचाऱ्यांना 3.85 टक्के महागाई भत्तावाढीची खूशखबर दिली आहे. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर वर्षाला 1792.71 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.
निवृत्त राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह जिल्हा पंचायतींमधील कर्मचारी, अनुदानित शिक्षण संस्थांमधील कर्मचाऱ्यांनाही भत्तावाढीचा लाभ मिळणार आहे. युजीसी/एआयसीटीई/आयसीएआर वेतनश्रेणीतील निवृत्त कर्मचारी, राज्य सरकारचे अनुदान घेणाऱ्या संस्थांमधील पूर्णवेळ कर्मचाऱ्यांनाही भत्तावाढ लागू आहे.
वर्षातून दोन वेळा भत्तावाढ केली जाते. यापूर्वी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2023 पासून लागू होईल याप्रमाणे भत्तावाढ देण्यात आली होती. त्यामुळे तेव्हा भत्ता 3.75 टक्क्यांनी वाढल्यामुळे 38.75 टक्क्यांवर पोहोचला होता. आता तो 42.50 टक्क्यांवर पोहोचला आहे.