कोल्हापूरकरांसाठी खुशखबर "सह्याद्री" पुन्हा सुरू होणार
सांगली :
कोल्हापूर सह दक्षिण महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी खुशखबर दिली आहे. कोल्हापूर - मुंबई मार्गावर लोकप्रिय सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा लवकरच सुरू करणार,कोल्हापूर कलबुर्गी इंटरसिटी एक्सप्रेस कोल्हापुरातून दिवसा धावेल आणि आठवड्यातून एकदा मिरज जंक्शनवरून हैदराबाद आणि चेन्नईसाठी एक विशेष गाडी सुरू केली जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी प्रवासी संघटनेच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
धर्मवीर मीना यांची मिरज जंक्शन पाहणी दौऱ्यावर आले असता सल्लागार समिती सदस्य व रेल्वे प्रवासी संस्था मिरज पदाधिकार्यांनी भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी मध्य रेल्वेचे पीसीओ शामसुंदर गुप्ता, पुणे विभागाचे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा, एस डी ओ एम डॉ. रामदास भिसे आदी उपस्थित होते.
यावेळी कोल्हापूर कलबुर्गी इंटरसिटी एक्सप्रेस सकाळच्या सत्रामध्ये सुरू करण्यात यावी व मिरज मधून हैदराबाद व चेन्नई या ठिकाणी नवीन गाडी सुरू करण्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी लवकरच सकाळच्या सत्रामध्ये कोल्हापूर कलबुर्गी इंटरसिटी एक्सप्रेस व कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्सप्रेस सुरू करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर मिरज मधून हैदराबाद व चेन्नईसाठी व्हाया सोलापूर मार्गे हॉलिडे स्पेशल एक्सप्रेस सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मार्च अखेर दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे मधून सुटणाऱ्या काही गाड्यांचा मिरज पर्यंत विस्तार केला जाईल असेही त्यांनी सांगितले.
कर्नाटक सीमेवरील शेडबाळे येथे होणाऱ्या जंक्शन संदर्भात प्रश्न उपस्थित केले असता 1992 साली मिरज - अथणी - विजयपूर या मार्गाचा सर्वे झालेला असून हा मार्ग शेडबाळ येथून सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यामध्ये हा मार्ग अस्तित्वात आल्यास तो मार्ग शेडबाळ येथूनच जाईल असे त्यांनी सांगितले. मिरज जंक्शनच्या "मॉडेल स्थानक" संदर्भात विचारले असता या कामाचा सर्वे नुकताच पूर्ण झालेला असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी मध्य रेल्वे क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत, रेल्वे प्रवासी संस्था, मिरज जंक्शनचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे, उपाध्यक्ष राजू पाटील, वाय. सी. कुलकर्णी, गणेश घोरपडे, तुषार शिंदे, सोपान भोरावत, सुरेश मसुरकर, लखन भोरे, कुंदन भोरावत आदींनी या मागण्यांचे निवेदन दिले.