सुदृढ नात्यासाठी...
एकंदरच आजच्या काळातील लगीनगाठ तितकी सोपी राहिली नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढणारी जवळीक आणि त्या आभासी जगात जगताना खऱ्या नात्याची विस्कटली जाणारी घडी, या संदर्भातल्या घटना आपल्या सभोवताली सर्रास घडताना पाहायला मिळतात!
सकाळीच दारावरची बेल वाजली. दार उघडलं तर बाहेर मनोज आणि मीनाक्षी उभे होते. अरे व्वा! आज खूप दिवसांनी..या या. ए दी सॉरी गं! फोन न करताच आलो आहे.
मनोज, तुला माझ्याकडे येण्यासाठी फोनची काय गरज? खूप दिवसांनी भेट होते आहे. तुम्ही बसा. चहा घेत निवांत बोलू आपण! मी आलेच.. असं म्हणून पाणी आणून ठेवले आणि मी चहा करायला आत गेले.
या दोघांमध्ये काहीतरी शाब्दिक चकमक सुरू होती. अगदी हुशार, जॉली, मनमोकळं असं हे तरुण जोडपं! आमचा अनेक वर्षांचा परिचय असल्याने तशी मैत्रीच होती.
घ्या चहा घ्या.. मीनाक्षी किती दिवसांनी आलात? अलीकडे माझेही येणं झालं नाही. काका काकू कसे आहेत? अगं परवाच तुमची आठवण काढली होती.
मनोज- चार दिवसांपूर्वीच आम्ही येणार होतो पण आमचे जॉब, ओम आणि रिमाची शाळा क्लास यात राहिलंच! पण आज एका वेगळ्याच कारणासाठी आलोय.
मीनाक्षी- थांब मनोज मला बोलू दे आधी. दोन दिवस जीवाला चैन नाही. डोकं जड झालंय नुसतं. काही सुचत नाही.
मी- मीनाक्षी काय झालंय नीट सांगशील का?
मनोज- काही नाही गं दी, काहीतरी वेड घेतलंय डोक्यात! मीनाक्षी -तू जास्त बोलू नकोस. मुलांच्या शाळा, अभ्यास, ट्युशन घर, नोकरी सारं बिन बोभाटपणे करते ना म्हणून तुला किंमत नाही.
मनोज- मीनाक्षी दोन दिवस तुला समजावून सांगितले डोक्यात शिरतंच नाहीये तुझ्या! माझ्या मनात असं काहीच नाही. तू आज ओळखतोस का मला?
मीनाक्षी- त्याचा प्रश्नच नाही पण तिला तू इन्स्टावर अशी कमेंट दिलीसच का? म्हणे छान दिसतेय..अमेझींग लूक..आणि फुलं कसली टाकतोस? आपलं स्टेटस तरी पहायचं. लोकं काय म्हणतील? सगळेच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतात ना?
मनोज-मीनाक्षी तुझा प्रॉब्लेम काय आहे? लोक काय म्हणतील हा? की तुलाच आवडत नाही?
मीनाक्षी-दोन्ही!
मनोज-(हसून)अगं मी लपून छपून तर बोललो नाही ना? बरं एखाद्याला छान म्हटलं तर एवढा का गहजब?
मीनाक्षी-(तोंड वाकडं करतच)अॅहॅहॅ...मला कधी असं म्हणायला फुरसत नसते तुला. बाकी बरं प्रेम उतू जातं तुझं..
मनोज- ए बाई..तू उगीच इश्यु करतेस..कॅज्युअली म्हटलं यार..एवढं काय त्यात?
मीनाक्षी-हे कॅज्युअल, कॅज्युअल करतंच पाय घसरतात. तू जास्त शहाणपणा केलास ना तर मी आणि माझी मुलं राहु आमचे आम्ही! तू बस सगळ्यांना लाईक आणि कमेंट देत!
दोघांचाही वादविवाद अगदी नाट्यामय रीतीने रंगात आला होता. विषय लक्षात आला. हस्तक्षेप करणं गरजेचं होतं. मी मीनाक्षीला थांबवत म्हटलं..अगं हो हो...किती चिडशील? हा मुद्दाम चिडवतोय तुला.
नाही दी..मग तो ओमची शपथ घेऊन का सांगत नाही.
मनोज-(हसत)शपथेने काय होणारे? काय तर शपथेवर विश्वास...कठिण आहे!
मीनाक्षी-बघ दी..तूच बघ!
मनोज, उगीच का पिडतोयस तिला. होऊ दे तिच्या मनासारखं..
मनोज-बरं..ओम शपथ..माझ्या मनात(हसत)जेनी विषयी काहीही नाही.
मीनाक्षी-खूपच उकळ्या फुटतायत नाही? जाऊ दे आता
शपथ घेतली ना..माझं समाधान झालं!
मी हसून म्हटलं..काय गं हे..लाईक, कमेंट वरुन इतकं भांडता? नंतर तिच्याजवळ झालेल्या सविस्तर चर्चेतून लक्षात आलं की तिच्या काही विवाहीत मित्र मैत्रिणींचे सोशल मीडियावरुन जुळलेले धागे, विस्कटलेले संसार हे तिचे अनुभव अगदी ताजे असल्याने ती मनोजच्या बाबतीत पझेसिव्ह झाली होती. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो तिच्या बाबतीत थोडा पझेसीव्हनेस असू शकतो परंतु त्याचं रुपांतर संशयात झालं आणि तो संशय वेळीच काढून टाकला नाही तर मग संशयकल्लोळ..आणि नात्याचा प्रवास वेगळ्या दिशेने होऊ लागतो.
अर्थात एकंदरच आजच्या काळातील लगीनगाठ तितकी सोपी राहिली नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढणारी जवळीक आणि त्या आभासी जगात जगताना खऱ्या नात्याची विस्कटली जाणारी घडी, या संदर्भातल्या अनेक केसीस सर्रास पाहायला मिळतात! ठराविक काळानंतर संसारातील तोच-तोचपणा काहींना अस्वस्थ करतो, तर कधी गंमत म्हणून सगळं
कॅज्युअली असता-असता ती कॅज्युअल रिलेशनशिप एवढी घट्ट होते आणि संसाराचा एक एक धागा विस्कटत जाऊन वैवाहिक नातंच उसवत जातं. उध्वस्त होतं.
कधी कोणी वा! छान! म्हणावं म्हणून..कधी थोडा निवांतपणा आहे म्हणून, कधी परस्परातील एखाद्या उणीवेची दुसऱ्याकडून पूर्तता होते म्हणून, तर कधी या ‘थ्रिल सिकिंगच्या’च्या जमान्यात रोज आयुष्य अळणी वाटू लागते आणि मग काही रोमँटिक शोधायच्या नादात दोघेही किंवा दोघांमधला एक जण भरकटू लागतो आणि मग वैवाहिक नातं डळमळू लागतं. लग्नानंतरही ‘प्रेम’या गोंडस नावाखाली अशा अनेक गोष्टी घडताना दिसतात. वैवाहिक नातं हे आता केवळ कागदोपत्री रजिस्टर असून चालणार नाही तर दोघांनीही त्या नात्याच्या संगोपनाच्या दृष्टीने सतत प्रयत्नशील असणे गरजेचे आहे.
परस्परांमधलं नातं हे डोळस विश्वासाचं असणं गरजेचं आहे. एकमेकांचे गुणदोष, स्पष्टवत्तेपणा, खरं सांगायची वा लपवायची प्रवृत्ती, पारदर्शकता या सगळ्याचा अंदाज येण्यासाठी संयम दाखवणे गरजेचे आहे. फेसबुक, व्हाट्सअप, इन्स्टा या गोष्टी असणारच आहेत! परंतु अतिशय सजग रहात त्याचा उपयोग करायला
हवा.तिथे व्यक्त होताना, त्याचा उपयोग करताना भान राखायला हवे. मुळातच पती-पत्नीने नाते जोपासण्यासाठी आत्मपरीक्षण करत राहणं गरजेचं आहे. दोघांच्या आयुष्यासोबतच दोन्ही कुटुंब जोडली गेलेली असतात याचे भानही आवश्यक आहे. लग्नासाठी जोडे झिजवावे लागतात हा विचार समाजात खोलवर रुजलाय.. परंतु नातं टिकवण्यासाठी व नात्याच्या संगोपनासाठी खरे श्रम त्यानंतरच सुरू होतात याची स्वीकृती करून दोघांनीही सजगता राखत वैवाहिक नातं सुदृढ राहण्यासाठी प्रयत्नशील असणे ही काळाची गरज आहे हे मात्र खरं !
अॅड. सुमेधा संजीव देसाई