एफएमसीजी, वाहन क्षेत्राला अच्छे दिन
रेपोदर कपात आणि चांगल्या पावसाच्या संकेताचा परिणाम : विविध तज्ञांनी व्यक्त केले सकारात्मक अंदाज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वर्ष 2025 च्या सुरुवातीपासून कर सवलती, रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) 100 बेसिस पॉइंट दर कपात करत सरकारने घेतलेल्या विविध सकारात्मक उपाययोजनांमुळे आणि चांगल्या पावसामुळे शहरी आणि ग्रामीण भागात मागणीत वाढ होईल. विशेषत: एफएमसीजी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील मागणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कृषी उत्पादनांच्या किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची अपेक्षा नसली तरी एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्या दुहेरी अंकी वाढीची अपेक्षा करत आहेत.
पारले प्रॉडक्ट्सचे उपाध्यक्ष मयंक शाह यांनी सांगितले की, ‘सरकारकडून घेतलेले सर्व उपक्रम वापराच्या दृष्टीने सकारात्मक आहेत. ग्रामीण आणि शहरी दोन्ही पातळीवर खर्च आणि मागणी वाढेल. यामुळे उर्वरित आर्थिक वर्षासाठी मागणीत दुहेरी अंकी वाढ होण्यास मदत होईल.’
गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्सना वैयक्तिक काळजी आणि गृह काळजी यासारख्या श्रेणींमध्ये मागणी वाढण्याची शक्यता आहे. गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे सेल्स हेड कृष्णा खटवानी म्हणाले, ‘आरबीआयने केलेल्या दर कपातीचा उद्देश कर्ज घेणे अधिक परवडणारे बनवून आणि ग्राहकांसाठी खर्च करण्यायोग्य उत्पन्न सुधारून आर्थिक चालना देणे आहे.
ब्लू स्टारचे व्यवस्थापकीय संचालक बी. थियागराजन म्हणाले, ‘सुधारित तरलतेमुळे भांडवली खर्च वाढेल, गृहकर्जाचा भार कमी होईल आणि अधिक ग्राहकांना बाजारात आणता येईल. आयकर सूट तुम्हाला अधिक दिलासा देईल. बी2बी (बिझनेस-टू-बिझनेस) आणि बी2सी (बिझनेस-टू-कंझ्युमर) दोन्हीमध्ये मागणी वाढेल. त्यांनी सांगितले की, एअर कंडिशनर आणि रेफ्रिजरेटरसारख्या वस्तूंची विक्री हंगामात फारशी चांगली नव्हती, परंतु येत्या सणासुदीच्या हंगामात मागणी वाढेल.