For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वृत्तपत्रीय जाहिरातींना ‘अच्छे दिन’!

06:34 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
वृत्तपत्रीय जाहिरातींना ‘अच्छे दिन’
Advertisement

वृत्तपत्रात प्रकाशित होणाऱ्या जाहिरातींची संख्या आणि प्रमाण यामध्ये 2024 मध्ये लक्षणीय स्वरुपात वाढ होणार असल्याचे ‘पिच मॅडिसन अॅडव्हर्टायझिंग’च्या 2024 च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. नव्यानेच प्रकाशित करण्यात आलेल्या या अभ्यासानुसार वृत्तपत्रीय जाहिरातींमध्ये एकूणच जागतिक स्तरावर वाढ अपेक्षित असून त्यामध्ये सर्वाधिक वाढ भारतीय वृत्तपत्रातील जाहिरातींमध्ये होणार असल्याचा सुखद अंदाज यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला आहे हे विशेष.

Advertisement

यासंदर्भातील मुलभूत व महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा जाहिरातदार त्यांची जाहिरात देण्यासाठी कुठल्याही माध्यमाचा विचार करतात तेव्हा त्यांच्यापुढे येणारा  एकमेव व महत्त्वाचा प्रश्न म्हणजे यातून माझा कसा आणि कितपत फायदा होणार? ही बाब प्रत्येक जाहिरातदार व सर्वच माध्यमक्षेत्रांना लागू होते.

जाहिरात क्षेत्रातील या मुद्यावर पारखले असता जाहिरातदारांचा स्वाभाविक कल अद्यापही आपल्या जाहिरातींसाठी वृत्तपत्रांसह मुद्रित माध्यमांकडे असल्याचे स्पष्ट होते. गेली काही वर्षे वार्षिक सुमारे 6 टक्के दराने होणारी वृत्तपत्रीय जाहिरात क्षेत्रातील व्यवसाय वाढ विविध आकर्षक व स्पर्धात्मक वातावरणातही अद्याप कायम आहे हे विशेष. जाणकारांच्या अंदाजानुसार यावर्षी वृत्तपत्रीय जाहिरातींचा व्यवसाय पुन्हा सुमारे 20,000 कोटींवर जाणे अपेक्षित असून ही व्यवसायिक आकडेवारी कोरोनापूर्व काळातील वृत्तपत्रीय जाहिरात व्यवसायाएवढी ठरेल. हा वार्षिक व्यावसायिक योगपण याद्वारे साधला जाऊ शकतो.

Advertisement

वृत्तपत्रीय जाहिरातींच्या व्यवसायाची कबुली जाहिराततज्ञ जाहीर स्वरुपात देऊ लागले आहेत.

यासंदर्भात प्रामुख्याने सांगायचे म्हणजे मारुती इंडियाचे प्रशांत श्रीवास्तव यांच्या मते जाहिरातदारांच्या दृष्टिकोनातून सांगायचे म्हणजे त्यांना त्यांच्या उत्पादनांची जाहिरात वृत्तपत्रांमध्ये अथवा मुद्रित माध्यम क्षेत्रात देण्याने विविध फायदे होत असतात. त्यांच्या मते यातील सर्वात मोठा व महत्त्वाचा लाभ म्हणजे वाचक-ग्राहकांचा आजही मुद्रित माध्यमांवर असणारा विश्वास व त्यांची पहिली माध्यम पसंती. त्यामुळे सर्वच जाहिरातदारांसाठी वाचक-ग्राहकांपर्यंत परिणामकारकरित्या पोहोचण्यासाठी वृत्तपत्रांसह मुद्रित माध्यमांना उत्पादक जाहिरातदारांची स्वाभाविक पसंती लाभते.

मारुतीच्या संदर्भातील आपला व्यावसायिक अनुभव सांगताना प्रशांत श्रीवास्तव नमूद करतात की, जाहिरातदार म्हणून थेट, प्रभावी व उपयुक्त ग्राहक संपर्काचे  माध्यम म्हणून ते नेहमीच मुद्रित माध्यमांना प्राधान्य देतात. त्यांच्या मते यामागे मुख्यत: दोन कारणे आहेत. एक म्हणजे ग्राहक म्हणून वाचकांचा आजही मुद्रित माध्यमांसह वृत्तपत्रांवर कायम असणारा विश्वास व माहितीसह जाहिरातींच्या संदर्भासाठी वाचकांसाठी मुद्रित माध्यमांची आजही कायम असणारी उपयुक्तता. याच विश्वास व उपयुक्ततेमुळे जाहिरातदारांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्री वाढीसाठी फायदा होत असतो.

सद्यस्थितीतील आर्थिक-व्यावसायिक योगाच्या पार्श्वभूमीवर एक बाब विशेषत्वाने नमूद करायची म्हणजे भारताचा सध्याचा सकल घरेलु उत्पादक निर्देशांक सुमारे 6 टक्के असून वृत्तपत्रीय जाहिरातीच्या व्यवसायवाढीचा वार्षिक दर सुद्धा 6 टक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे.

व्यावसायिक जाहिरातदारांच्या मते सांगायचे झाल्यास उद्योग, व्यवसाय व त्यानुषंगाने असणाऱ्या जाहिराती यांचा कोविड दरम्यान व त्याकाळातील झालेला व्यावसायिक नकारात्मक परिणाम 2023 सरता सरता जवळपास संपुष्टात आला असून 2024-25 या नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात ही वृत्तपत्र आणि वृत्तपत्रीय जाहिराती आणि जाहिरातींच्या संदर्भात नव्याने व नव्या उमेदीसह होण्याचे स्पष्ट संकेत आहेत.

याच मुद्याला दुजोरा देताना विख्यात जाहिराततज्ञ व ‘मॅडिसन’चे अध्यक्ष सॅम बलसारा नमूद करतात की, भारताच्या जाहिरात क्षेत्राच्या संदर्भात मुद्रित माध्यमांच्या जाहिरातींचे महत्त्व नेहमीच मोठे राहिले आहे. जागतिक स्तरावर  मुद्रित माध्यमांमधील जाहिरातींचे प्रमाण सुमारे 4 टक्के असल्याचे नमूद करून भारतातील वृत्तपत्रीय जाहिरातींचे प्रमाण हे जगात नेहमीच जास्त असल्याचे व वाढीव प्रमाणात राहण्याचा आशावादी अंदाजही आज सॅम बलसारा यांच्यासारखे व्यवसाय तज्ञ व्यक्त करीत आहेत.

नव्यानेच प्रकाशित झालेल्या पिच मेडिसन

अॅडव्हर्टायझिंगच्या अहवालानुसार आज मुद्रित माध्यम क्षेत्रातील जाहिरात व्यवसायाचा विचार करता भारत आज  जगात अग्रेसर आहे. चीनमध्ये वृत्तपत्रीय जाहिरात व्यवसायाचे प्रमाण अक्षरश: शून्य असताना भारतात आज वृत्तपत्रीय जाहिरात व्यवसायाचे प्रमाण एकूण जाहिरात व्यवसायापैकी 20 टक्के आहे. ही प्रचलित आकडेवारी जागतिक स्तरावर बोलकी व मार्गदर्शक ठरते. मेडिसनच्या याच अहवालात पुढे नमूद केल्यानुसार गेल्या तीन वर्षांचाच विचार करता वृत्तपत्रीय जाहिरात व्यवसायात दरवर्षी खालीलप्रमाणे वाढ झाली आहे.

वर्ष          मुद्रित माध्यमांचा जाहिरात व्यवसाय

2021       16,595 कोटी रु.

2022       18,470 कोटी रु.

2023       19,250 कोटी रु.

वृत्तपत्रीय जाहिरातींच्या व्यावसायिक योगदानाबरोबरच मुद्रित माध्यमांमधील जाहिरातींचे अन्य प्रमुख वैशिष्ट्या म्हणजे वाचक, ग्राहकांशी त्यांचा असणारा नित्य व थेट संपर्क आणि माध्यम क्षेत्रात त्यांनी अनेक वर्षे प्रस्थापित केलेली व जपलेली सर्व वयोगटातील वाचकांची विश्वासार्हता. त्यामुळेच कॉलेजपासून कंपनीपर्यंत वा शाळेपासून शेअर्सपर्यंत जीवनाच्या विविध क्षेत्रांशी संबंधित जाहिरातदारांची पहिली पसंती मुद्रित माध्यमांनाच असते.

भारतातील वृत्तपत्रीय जाहिरातींच्या संदर्भात विशेषत्वाने नमूद करण्याजोगी बाब म्हणजे जाहिरातदारांच्या दृष्टिकोनातून वृत्तपत्रीय जाहिराती या बहुभाषिक जनसामान्यांपर्यंत तर पोहोचतातच, त्याशिवाय अशा मुद्रित स्वरुपातील जाहिरातींच्या माध्यमातून वाचक-ग्राहक संपर्क सहजशक्य व अधिक परिणामकारक ठरतो. विशेषत: आर्थिक सेवा क्षेत्र, बँकिंग, नित्योपयोगी वस्तू, घरगुती वापराचे व घरातील सर्वांना उपयोगी उत्पादने इ. च्या जाहिरातींच्या संदर्भात ही बाब प्रकर्षाने जाणवते.

यासंदर्भात डाबर इंडियाचे मुख्याधिकारी मोहित मल्होत्रा तर स्पष्टपणे नमुद करतात की, ‘डाबर’चा वृत्तपत्रे व मुद्रित माध्यमांमधील जाहिरातींवरील परंपरागत विश्वास अगदी कोरोना काळात व त्यानंतर सुद्धा डळमळला नाही. जाहिरात व्यवसाय क्षेत्रात जाहिरातदाराचा एका विशेष माध्यमावर असणाऱ्या विश्वासाचे हे विरळ असे उदाहरण म्हणायला हवे.

‘टाइम्स’ समुहाच्या बेनेट कोलमन कंपनीच्या मुद्रित माध्यम विभागाचे मुख्याधिकारी शिवकुमार सुंदरम हे वृत्तपत्रीय जाहिरातींच्या संदर्भात सद्यस्थितीसह नजिकच्या भविष्याच्या संदर्भात विशेष आशादायी आहेत. त्यांच्या मते वृत्तपत्रांना आजवर मिळणाऱ्या जाहिरातदारांच्या परंपरागत पाठिंब्यामागचे मुख्य कारण म्हणजे दररोज व नित्य नेमाने होणारा वाचक-ग्राहक संपर्क. त्यांच्या मते यामागे गेल्या काही वर्षातील आर्थिक बदलाची विकासपर पार्श्वभूमी आहेच. ज्या प्रकारे शहरी मध्यमवर्गापासून ग्रामीण शेतकऱ्यांपर्यंत आर्थिक प्रगती झाली आहे. त्यामुळे या मंडळींची क्रयशक्ती वाढली असून जाहिरातदारांच्या वृत्तपत्रीय जाहिरातींना वाढता व सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

- दत्तात्रय आंबुलकर

Advertisement
Tags :

.