For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गेले ते दिन गेले...

06:10 AM Sep 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
गेले ते दिन गेले
Advertisement

वेगवेगळी फुले उमलली रचुनी त्यांचे झेले

Advertisement

एकमेकांवरी उधळले गेले ते दिन गेले

कॉलेजच्या वर्षांच्या निरोप समारंभात बऱ्याचदा गायले जाणारं आणि अनुभवलं जाणारं हे गाणं! वय वर्ष 15 ते वय वर्ष 20 ही माणसाच्या आयुष्यातली सर्वोच्च सुख देणारी वर्षे असतात असं म्हटलं जातं. याच वर्षांमध्ये मूल कॉलेजला जात असतं. शरीरामध्ये बदल होत असतात, मनामध्ये बदल होत असतात. तारुण्याने मोहरलेलं, नवीन विचाराने भरलेलं, देहात मनात सतत वाढत जाणारी अदम्य शक्ती, प्रचंड उत्साह असणारं मन. आणि मुळातच समाज प्रिय समूहप्रिय असणाऱ्या मुलांना त्यांचं सामाजीकरण साजरं करण्यासाठी रोज मिळणाऱ्या नवनवीन संधी त्यामुळे कॉलेजची वर्षे खरोखरंच अविस्मरणीय ठरतात. सर्वसामान्यपणे कॉलेजला जाणाऱ्या मुलाला आर्थिक जबाबदाऱ्या नसतात.

Advertisement

उद्याची चिंता नसते. सुंदर शरीर, भरपूर ताकद, अप्रतिम सौंदर्य, तरुण वय त्याचा जोश या सर्वांचा आनंद घेणे आयुष्यातलं सर्वोच्च सुख अनुभवणे यासाठीचे हे दिवस असतात. अर्थात त्याचबरोबर आपला उत्तम उद्या घडवण्यासाठी मेहनत करणे, घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये सुयश मिळवणे आणि भावी आयुष्य सुखाने जगण्यासाठीची पायाभरणी करणे हेही याच वर्षांमध्ये केलं जातं. त्यामुळे कॉलेजच्या या वर्षांमध्ये पुरेशी मेहनत करणारे आणि आपल्या उर्जेचा योग्य दिशेने वापर करणारे लोक पुढे जाऊन आयुष्यात निश्चितच यशस्वी होतात, याबद्दल काहीही दुमत असण्याचे कारण नाही. तर असे या सर्व गोष्टी एकावेळी करण्याचे हे दिवस प्रत्येकासाठी खासच आणि संस्मरणीय असतात. त्यामुळेच की काय पुढच्या आयुष्यात कॉलेजच्या रियुनियनला जमणाऱ्यांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. तीव्र भावभावनांचा चढ उतार अनुभवायला मिळणारी ही वर्षे जेव्हा संपतात आणि निरोप घेण्याची वेळ जेव्हा सर्वांवर येते त्यावेळी हे गाणं प्रत्येकाच्या मनात नक्कीच वाजत असेल. कारण त्या वेळेला इतकी वर्षे, इतके दिवस आपण जोडीने खेळलो-भांडलो, अभ्यास केला. तासन्तास चर्चा केल्या, स्पर्धा जिंकल्या. या सर्व गोष्टी आता इथेच सोडायच्या आहेत. इथून पुढे प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या. प्रत्येकाचे मार्ग वेगळे. प्रत्येकाचं आयुष्य वेगळे असणार आहे. वेगवेगळ्या घरातल्या लोकांनी संपूर्ण वेगळ्या ठिकाणी एकत्र येऊन एक सुंदरसा गट तयार केलेला असतो आणि पुन्हा सगळं एकदा मोडायचं आहे. नवीन डाव मांडण्यासाठी वेगळ्या दिशेने प्रवास करायचा आहे. अशा वेळची मनस्थिती, अशा वेळेला मनाची होणारी घालमेल काय सांगावी.

कदंबतरूला बांधुन दोला उंच खालती झोले

परस्परांना दिले घेतले गेले ते दिन गेले

अशीच मनोवस्था सर्वांची असते. भावना तीव्र असण्याचे ते दिवस. त्यामुळे स्वत:च्या भावनांना आणि व्यक्त होण्याला बांध घालणं खूप कठीण जात असतं. एक प्रकारचा पराकोटीचा हताशपणा आणि दु:ख असतं की ही चाकोरी इतकी सुंदर असताना का सोडायची? मन आक्रंदन करत असतं. बरं याच कॉलेजच्या दिवसांत मुलं प्रेमात पडत असतात. पहिल्या प्रेमाचा नाजूक बिलोरी आरसा कधी कधी याच दिवसात तडकून चूर चूर होत असतो. कॉलेजच्या कोवळ्या दिवसातलं नवथर प्रेम का कोण जाणे पण माणसाला शेवटपर्यंत छळतं. गाताना लागणारे ते वर्ज्यस्वर असतात ना, त्या वर्ज्यस्वरांमुळे खरं तर एक राग उभा राहत असतो ही गोष्ट खरी असते. पण कधी कधी हे वर्ज्यस्वर इतके छळतात, इतके छळतात की का कोण जाणे त्यांचे वर्ज्यपण टाळून त्यांना आत घेण्याचा मोह होतोच. तेव्हाच्या आयुष्यात स्वैरपणे कशाचाही विचार न करता उपभोगलेले, पण आताच्या आयुष्यात वर्ज्य झालेले असे काही क्षण असतात किंवा काही घटना असतात. काही व्यक्तीही असतात. अतिशय प्रिय असलेल्या काही गोष्टी मागे ठेवून अपरिहार्यपणे पुढे जाण्याची पहिली वेळ जाणत्या वयात त्या मुलावर येते ती महाविद्यालयीन जीवन पूर्ण करताना. हे गोड छोटंसं घरटं, हे रंगीबिरंगी वातावरण, हेच काय ते आयुष्य असं समजण्याच्या वयात वास्तवाने दिलेला हा पहिला धक्का असतो. याच्या असंख्य काचेरी जाणिवा टोचल्याशिवाय आणि रक्तबंबाळ केल्याशिवाय कशा राहतील?

निरोपाच्या क्षणी नेमकं किती आणि काय काय आठवतं! कोणकोणत्या गोष्टी म्हणून लक्षात ठेवाव्यात? इर्षेने पेटून केलेल्या असंख्य स्पर्धा? की कॉलेज डेज साजरे करताना त्याने आणि तिने खऱ्या अर्थाने जगलेले नवे कोवळे क्षण? घरच्यांपासून दडवून ठेवलेले आणि मित्रांना सांगितलेले कितीतरी सल? की आज पर्यंत अंड्यात असलेल्या आपल्याला एकाएकी पोक्त करून टाकणारा एखादा अतिशय जीवघेणा प्रसंग? कधीकधी समवयस्कांच्या गराड्यात नको त्याच्या नादी लागून आयुष्याची दिशासुद्धा भरकटू लागलेली असते. पण सुदैवाने त्यातून वेळीच बाहेर पडून आपण सावरलेले असतो. आणि आपल्याला सावरण्यासाठी कारणीभूत असणारे कोणत्यातरी व्यक्तीचे डोळे, तिची ती दृष्टी कदाचित इथून पुढे दिसणार नसते कधी. आयुष्यात तिची साथ तेवढीच असते हे मनाला कसं पटवून द्यायचं? बाह्य रंग बाह्य रूप याला भुलून केलेले असंख्य यशस्वी प्रवास शेवटी आपल्याला अशा निष्कर्षापर्यंत नेऊन सोडत असतात की प्रत्येक शरीराच्या पाठी एक बरं वाईट घडलेलं परिपूर्ण मन आहे. कोणतीतरी तहान भागल्यासारखा आपला वेडावाकडा प्रवास तिथे येऊन थांबतो. आणि ही समज आपल्याला त्याच पाच वर्षात आलेली असते. बालपणी नदीकिनारी, समुद्रकिनारी फिरून गोळा केलेल्या शंखशिंपल्यांचा खजिना सुद्धा आठवणींच्या, भावनांच्या, प्रसंगांच्या या खजिन्यापुढे फिका पडतो.

 निर्मलभावे नवदेखावे भरुनी दोन्ही डोळे

तू मी मिळुनी रोज पाहिले गेले ते दिन गेले

स्वच्छ निरागस पूर्वग्रहरहित मनाने रोज नव्या दृष्टीने पाहिलेले हे देखावे, त्यावेळीची ती साथ आणि त्यानंतरच्या आयुष्यात जाणवणारा तो एक रितेपणा कुठून आणि कसा भरून काढायचा?

पूर्वायुष्यात घडलेल्या घटना, आनंदी क्षण हे उत्तरायुष्यात आठवणी होऊन मनाला अक्षरश: कातरत राहतात. म्हणून एकांतात, शांत वेळी या आठवणी छळत राहतात आणि मनात येतं.

गेले ते दिन गेले...

अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु

Advertisement
Tags :

.