For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘गोंधळ’चा जागतिक जलवा; ऑस्करसाठी भारताकडून मराठी चित्रपटाची निवड

06:22 PM Sep 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘गोंधळ’चा जागतिक जलवा  ऑस्करसाठी भारताकडून मराठी चित्रपटाची निवड
Advertisement

मुंबई : 99 व्या अकादमी पुरस्कारांसाठी दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने (FFI) शुक्रवारी, 18 सप्टेंबर रोजी मुंबईत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. देशभरातून आलेल्या 33 चित्रपटांमधून ‘गोंधळ’ची निवड करण्यात आली.

Advertisement

महाराष्ट्राच्या ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित ‘गोंधळ’ हा चित्रपट पारंपरिक ‘गोंधळ’ विधी आणि लोककलेभोवती गुंफण्यात आला आहे. संगीत, नृत्य आणि कथनाच्या माध्यमातून सादर होणाऱ्या या पारंपरिक विधीच्या पार्श्वभूमीवर मानवी नातेसंबंध, इच्छा, मत्सर आणि अंतर्गत संघर्ष यांची कथा चित्रपटातून मांडण्यात आली आहे.

संतोष डावखर यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. ‘गोंधळ’ला यापूर्वी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही दाद मिळाली असून, गोव्यातील 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात डावखर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ‘सिल्व्हर पीकॉक’ पुरस्कार मिळाला होता.

Advertisement

या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी यांच्यासह अन्य कलाकारांच्या भूमिका आहेत. विविध भाषांतील 33 चित्रपटांच्या स्पर्धेतून ‘गोंधळ’ची निवड झाली.

भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाल्यानंतर ‘गोंधळ’ आता ऑस्करच्या पुढील प्रक्रियेत सहभागी होणार आहे. 99 वे अकादमी पुरस्कार 14 मार्च 2027 रोजी होणार असून ‘बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म’ श्रेणीतील पुढील निवड प्रक्रिया त्यानंतर पार पडेल.

Advertisement
Tags :

.