For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सदोष ट्रॅकजोडणीमुळे गोंडा रेल्वे अपघात

07:00 AM Jul 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
सदोष ट्रॅकजोडणीमुळे गोंडा रेल्वे अपघात
Advertisement

पाच सदस्यीय चौकशी समितीचा निष्कर्ष, मात्र रेल्वे विभागाचा अहवालाला आक्षेप

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

रेल्वेट्रॅकची जुळणी योग्य प्रकारे न झाल्यामुळे गोंडा रेल्वे अपघात घडला, असा ठपका या अपघाताची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पाच सदस्यांच्या समितीने ठेवला आहे. मात्र, हा निष्कर्ष एकमुखी नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. पाच सदस्यांपैकी एका सदस्याने या निष्कर्षाच्या विरोधात मत व्यक्त केले आहे. रेल्वे विभागानेही या निष्कर्षाला आक्षेप घेतल्याची माहिती आहे. दोन रेल्वेट्रॅ^क्स एकमेकांना योग्य प्रकारे जोडले न गेल्याने (इंप्रॉपर फास्टनिंग) हा अपघात घडला. रुळांची ही जुळणी दुष्प्रभावी ठरली. या सदोष जोडणीमुळे रेल्वेगाडी अचानक भिन्न मार्गावर गेली. तिच्या पुढे जाण्यावर नियंत्रण राहू शकले नाही. परिणामी हा अपघात घडला, असे चौकशी समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. आसामच्या दिब्रूगढ येथील गोंडा येथे गेल्या गुरुवारी झालेल्या या अपघातात एक्स्पे्रसचे सहा डबे रुळावरुन घसरले होते. या अपघातात 5 जणांचा बळी गेला होता. त्याच्या चौकशीसाठी ही समिती स्थापन झाली होती.

Advertisement

सोमवारी अहवाल देणार

चौकशी समितीने सविस्तर अहवाल तयार केला असून तो सोमवारी केंद्र सरकार आणि रेल्वे विभागाला सादर केला जाणार आहे. या अहवालातील सर्व माहिती अद्याप बाहेर आलेली नाही. ती समजल्यानंतरच अंतिम प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

इंजिनिअरला आढळला दोष

रेल्वेच्या लखनौ विभागाच्या वरीष्ठ इंजिनिअरच्या लक्षात दोष आला होता. याच इंजिनिअरच्या कार्यकक्षेत अपघाताचे स्थान येते. अपघाताच्या दिवशी दुपारी दीड वा. त्यांनी तपासणी केली असता आयएमआर दोष असल्याचे त्यांना समजले होते. त्यानंतर जवळपास तासाने म्हणजे दुपारी 2 वाजून 31 मिनिटांनी हा अपघात घडला. त्याच्या आधी काही काळ चंदीगढ-दिब्र्रूगढ एक्स्पे्रसने मोतीगंज स्थानक मागे टाकले होते. मोतीगंज स्थानकाच्या स्टेशन मार्स्टरला ही माहिती 2 वा. दिली होती व गाड्यांचा वेग 30 कि.मीटरच्या आत ठेवण्याची सूचना गाडीच्या चालकाला देण्यात यावी, असे स्टेशन मास्टरला स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतर काही वेळातच अपघात घडला व रेल्वेचे डबे रुळावरुन घसरले अशी माहिती अहवालात देण्यात आल्याचे समजते.

वेग अचानक वाढला

गाडीच्या चालकाने मोतीगंज स्थानक 2 वाजून 28 मिनिटांनी सोडले त्यावेळी गाडीचा वेग 25 किलोमीटर प्रतितास इतका होता. तथापि, अपघात घडला त्यावेळी हा वेग 80 किलोमीटर पर्यंत पोहचला होता. तो 30 किलोमीटरपेक्षा कमी असता तर अपघाताची तीव्रता बऱ्याच प्रमाणात कमी असती. आपला ट्रॅक चुकला आहे, हे लक्षात येताच चालकाने एकदम ब्रेक लावले. त्यामुळे मागचे डबे रुळावरुन घसरले, अशी माहिती रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. रेल्वेच्या चालकाच्या म्हणण्यानुसार जेव्हा अपघातामुळे रेल्वे थांबली त्यावेळी त्याने मागे वळून पाहिले असता डबे रुळांवरुन घसरल्याचे त्याच्या लक्षात आले, अशी माहिती त्याने स्वत: चौकशी आयोगाच्या प्रथम सुनावणीत दिल्याचे स्पष्ट केले.

रेल्वे सुरक्षा आयोगाचीही चौकशी

रेल्वे सुरक्षा आयोगाने या अपघाताच्या चौकशीसाठी समितीची स्थापना केली असून या समितीने शुक्रवारी पहिली सुनावणी केली. या अपघाताच्या सर्व पैलूंचा अभ्यास ही समिती खोलात जाऊन करणार आहे. अपघाताच्या प्रत्येक कारणाचा बारकाईने तपास केला जाईल. तांत्रिक बाजू, मानवी बाजू आणि परिस्थितीजन्य बाजू अशा सर्व मुद्द्यांचा विस्ताराने विचार केला जाणार असून त्यानंतर उत्तरदायित्व निर्धारित केले जाईल, अशी माहिती आयोगाने शनिवारी दिली. सुरक्षा आयोगाने अद्याप घातपाताची शक्यता पूर्णत: फेटाळलेली नाही. सर्व शक्यता गृहित धरुन चौकशी केली जात आहे अशी माहितीही सूत्रांनी शुक्रवारी दिला आहे. रेल्वे विभागाच्या अहवालानंतर स्थिती आणखी स्पष्ट होणार आहे.

Advertisement
Tags :

.