दिवाळी पर्वासाठी गोमंतकीय सज्ज!
प्रतिनिधी/ पणजी
दिवाळीचे महत्त्व हे अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय दर्शवते. धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा व भाऊबीज असे पाच दिवस हा सण साजरा होतो. दिवाळी आनंद, एकता आणि नातेसंबंधांचा उत्सव असल्याने हा सण राज्यभरात आजपासून साजरा होत असून, हा उत्सव साजरा करण्यासाठी राज्य सज्ज आहे.
दिवाळी सणामुळे आतापासूनच सामाजिक माध्यमे, प्रत्यक्ष भेटी देऊन दिवाळी उत्सवाच्या शुभेच्छा देण्यात अनेकजण व्यस्त आहेत. पंचपक्वान्न, फराळ, विविध तऱ्हेची मिठाईची देवाण-घेवाण करून दिवाळी उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यात प्रत्येकजण व्यस्त आहे. विविध कपडे, विद्युत रोषणाईचे साहित्य, सजावटीचे साहित्य, शोभेच्छा वस्तू, सुगंधी साबण, दिवाळी सणातील महत्त्वाचा घटक असलेले उटणे आदींनी राज्यातील बाजारपेठा फुलल्या आहेत. खरेदीसाठी लगबग तर भलतीच सुरू आहे. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळीही बाजारपेठा, मार्केट यामध्ये ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे.
दिवाळीचे पाच दिवस धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा (पाडवा) आणि भाऊबीज हे असून प्रत्येक दिवसाचे स्वत:चे असे महत्त्व आहे. या उत्सवाचा उद्देश ‘अंधारावर प्रकाशाचा विजय’ साजरा करणे हा आहे. धनत्रयोदशीला संपत्तीची खरेदी केली जाते, नरकचतुर्दशीला नरकासुराचा वध आणि लक्ष्मीपूजनात देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. पाडवा आणि बलिप्रतिपदेला बळीराजाच्या स्मरणात आणि पती-पत्नीच्या नात्यातील प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो, तर भाऊबीज भावाबहिणीच्या नात्याचा सन्मान करते.
दिवाळी उत्सवामुळे अनेक ठिकाणी गर्दी होत असल्याने वाहतुकीवरही ताण आलेला पहायला मिळत आहे. पार्किंगची जागा वाहनांनी व्यापली जात आहे. तर वाहतूक पोलिसही वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी दक्ष आहेत. दिवाळी सण हा पावित्र्याचा, मांगल्याचा असल्याने नागरिकांनी बाजारहाट किंवा खरेदीसाठी शहरात किंवा मुख्य रस्त्यावरही वाहतुकीचे नियम पाळून वाहने चालवावीत, असे वाहतूक खात्यातर्फे आवाहन करण्यात आले आहे.
दिवाळीच्या पाच दिवसांचे महत्त्व
?धनत्रयोदशी : या दिवसाची सुऊवात होते आणि हा दिवस सोने, चांदी आणि भांडी खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो, ज्यामुळे घरात समृद्धी येते.
?नरकचतुर्दशी : या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला, असे मानले जाते. या दिवशी अभ्यंगस्नान करून वाईट शक्तींचा नाश होतो असेही मानले जाते.
?लक्ष्मीपूजन : दिवाळीचा मुख्य दिवस, ज्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. घरात सुख-समृद्धी आणि भरभराट यावी यासाठी ही पूजा केली जाते.
?बलिप्रतिपदा / पाडवा : या दिवशी भगवान विष्णूने वामनरूप घेऊन बळीराजाला पाताळात पाठवले होते. हा दिवस पती-पत्नीच्या नात्यातील प्रेमाचा उत्सव म्हणूनही साजरा केला जातो.
?भाऊबीज : दिवाळीचा शेवटचा दिवस. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. हे भावाबहिणीच्या अतूट नात्याचे प्रतीक आहे.