महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘गोलमाल रिटर्न्स’

06:24 AM Jan 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

देशातील मोठ्या लोकसंख्येचे आणि भूभागाचे प्रतिनिधित्व करणारा प्रदेश म्हणजे बिहार. लोकशाहीची जन्मभूमी असेही लाडाकोडाने या भूभागाला म्हटले जाते. गेली 25 वर्षे नितीश कुमार यांची येथे एक समाजवादी कसरत सुरू आहे. भारतीय राजकारणातील अमोल पालेकर, असे त्यांना म्हणणे ही खरेतर तत्त्वाने जगणाऱ्या अभिनेते अमोल पालेकर यांची अवहेलनाच. पण, पालेकर बनून नसले तरीही त्यांच्या चित्रपटातील पात्र बनून नितीशकुमार गोलमाल आणि कथा या चित्रपटाप्रमाणे जगत आले आहेत. कॉलेज अवस्थेत आपल्या सोबत असलेले लालू प्रसाद, जितेंद्र प्रसाद पुढे निघून चालले असले, तरी एकदिवस आपणही त्यांच्या गतीने धावत राजकीय शर्यत जिंकणार, या ईर्षेने त्यांची राजकीय कथा सुरू झाली आणि त्या शर्यतीत कायम आपण पहिल्या नंबरवर पाहिजे, या आग्रहाने त्यांना जीवनभर गोलमाल राजकारण करावे लागले. कधी भाजपला सोडचिठ्ठी दे आणि लालूंचा हात धर, तर कधी लालूंचा हात सोड भाजपच्या गळ्यात पड, कधी स्वत:च्या सहकाऱ्याला मुख्यमंत्री बनव आणि नंतर कारस्थान करून त्याची गच्छंती कर, असे बेभरवशाचे राजकारण करत ते आता पुन्हा आठव्यांदा युती सरकार तोडून भाजपसोबत सरकार बनवून नवव्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत विरोधी इंडिया आघाडीद्वारे देशाचे पंतप्रधानपद मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवत अखेर सहा महिन्यांच्या मुख्यमंत्रिपदावर त्यांनी भाजपशी डील पक्के केले आहे. जनता दल या 1980 चा उत्तरार्ध आणि 90 चा पूर्वार्ध गाजवलेल्या पक्षात जॉर्ज फर्नांडिस, शरद यादव, नितीश, लालू आणि रामविलास पासवान हे पाच दिग्गज बिहारातून उदयाला आले. राज्यकर्ते बनले. नंतर 1997 मध्ये त्यांच्यात फूट पडली. लालूंचा राष्ट्रीय जनता दल सर्वांत मोठा झाला. समता पार्टी नावाने जॉर्ज, शरद आणि नितीश यांनी भाजपशी आघाडी केली. येथून या राज्यात काँग्रेसचे उच्चाटन आणि भाजपची प्रस्थापना होत गेली. पण 90 ते 2005 लालू सलग मुख्यमंत्री होते. त्यांचा पंधरा वर्षे जंगलराज, तर नंतरचा जितमराम मांझी यांचा किरकोळ काळ सोडला, तर अनेक लटपटी आणि खटपटी करून नितीश कुमार मुख्यमंत्रिपदावर राहिले आहेत. त्यांच्या सुऊवातीच्या दहा वर्षांचा उल्लेख सुशासन पर्व असा केला जातो. स्वाभाविकच त्यांच्यामुळे तिथे भाजपला सत्तेची चव चाखायला मिळाली, हे नाकारून चालणार नाही. तथापि, आज परिस्थिती पूर्ण बदलली असून राज्यातल्या स्पर्धकांच्या तुलनेत नितीश सर्वात मागे पडले आहेत. मुख्य म्हणजे त्यांची विश्वासार्हतादेखील कमी झाली आहे. परिणामी त्यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त जनता दलाचा आलेखही झपाट्याने घसरल्याचे दिसून येते. 2020 च्या विधानसभा निवडणुकीत संजदला मिळालेल्या 43 जागा हे त्याचे जिवंत उदाहरण ठरावे. या निवडणुकीत राजद 75 जागांसह सर्वांत मोठा पक्ष ठरला. तर नितीश यांचा सहकारी पक्ष असलेल्या भाजपाने त्यांच्यापेक्षा अधिक म्हणजेच 74 जागा मिळवून आघाडी घेतली. एवढा मोठा धक्का बसूनही पुन्हा नितीश यांच्याकडेच नेतृत्व ठेवण्याचे धोरण भाजपाने अवलंबले. त्यानंतरही नितीश राजदसोबत जाऊन सरकार बनवतात व लोकसभेच्या तोंडावर पुन्हा भाजपाच्या मदतीने मुख्यमंत्री होतात, हे सगळेच आकलनाच्या पलीकडचे होय. हा फिरून फिरून भोपळे चौकात येण्याचा त्यांचा गोल-गोल प्रवास संजदला कुठे नेणार, हेच पाहणे पुढच्या काळात औत्सुक्याचे ठरणार आहे.  2005 मध्ये संजदने 88 जागांसह आघाडी मिळविली. त्यानंतर 2010 मध्ये नितीश यांच्या पक्षाने तब्बल 115 जागांवर मुसंडी मारली होती. हा नितीश यांच्या शिखरावस्थेचा काळ म्हणता येईल. दुसरीकडे याच निवडणुकीत भाजपाला 91, तर राजदला 22 जागांवर समाधान मानावे लागले होते. 2015 मध्ये संजद 71, राजद 80, भाजपा 53 असे पक्षीय बलाबल राहिले. येथूनच हळूहळू पक्षाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागल्याचे पहायला मिळते. 2020 मध्ये नितीश यांची पलटूराम ही प्रतिमा पक्की व्हायला सुऊवात झाली होती. त्याचेच प्रतिबिंब निकालावर पडताना दिसले. मुळात ही प्रतिमा निर्माण करण्यात विरोधकांपेक्षा नितीश यांचेच कर्तृत्व अधिक कारणीभूत ठरल्याचे दिसत आहे. मागच्या चार वर्षांत आपले मुख्यमंत्रिपद टिकविण्यात त्यांना यश आले असले, तरी त्यांची घटती ताकद पाहता त्यांचे राज्याच्या व देशाच्या राजकारणातील महत्त्व कमी होणार, हे वेगळे सांगायला नको. मागच्या काही वर्षांत भाजपानेही बिहारमध्ये चांगले पाय रोवले आहेत. तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली राजदनेही आपला पाया बळकट केला आहे. त्यामुळे राज्यात हे दोनच पक्ष मुख्य स्पर्धक असतील, यात कोणताही संदेह नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत जागा वाटपापासून सगळ्याच पातळीवर नितीश यांना संघर्ष करावा लागेल. भाजपा असो वा राजद. या पक्षांनी अधिकच्या जागा मिळूनही नितीश यांना मुख्यमंत्री करण्याचे औदार्य दाखविले असले, तरी भविष्यात ते ही चूक करतीलच, असे नाही. वास्तविक इंडिया आघाडीच्या निर्माणाकरिता सर्वाधिक पुढाकार त्यांनीच घेतला. किंबहुना, नितीश यांच्यावर विश्वास नसल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्याची कोणत्याच पक्षाची इच्छा नव्हती. ममतांपाठोपाठ नितीश बाहेर पडल्याने इंडियाला झटका बसला, हे खरेच. पण, त्यांच्यासारख्या शक्तीहिन व अविश्वासू सहकाऱ्यापेक्षा काँग्रेस आघाडीने स्वतंत्र लढणे कधीही बरे. नितीश यांच्या उलटपुलट राजकारणाचा भाजपालाही वेळोवेळी त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे पुढचे गणित साधल्यानंतर या पक्षाचेही चाणक्य त्यांना धक्का देण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. कुणाला कधी डोक्यावर घ्यायचे व कधी आपटायचे, हे जनतेला चांगले ठाऊक आहे. नितीश यांचे ‘गोलमाल’ राजकारणही आता याच वळणावर आहे.

Advertisement

 

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article