For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुवर्ण कारागिराची लूट : मित्राच्याच फितुरीमुळे पडला दरोडा

07:55 AM May 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
सुवर्ण कारागिराची लूट   मित्राच्याच फितुरीमुळे पडला दरोडा
Advertisement

एक लाख रोख, 225 ग्रॅम सोने लुटले, दरोडा घालणाऱ्या आठ जणांना अटक

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : उचवडे, ता. खानापूरजवळ गोव्याला निघालेल्या सुवर्ण कारागिरांना अडवून त्यांच्याजवळील रोकड व 225 ग्रॅम सोन्यावर डल्ला मारणाऱ्या आठ जणांच्या टोळीला खानापूर पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस तपासात या प्रकरणाला कलाटणी मिळाली असून सुवर्ण कारागिराच्या मित्रांच्या फितुरीमुळे हा दरोडा पडल्याचे सामोरे आले आहे. जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत या घटनेसंबंधी माहिती दिली आहे. 20 मे रोजी एस. के. इबादुल, मूळचा राहणार ठाकुरहाट-सिंगूर, हुगली, प. बंगाल, सध्या राहणार जोशी गल्ली, शहापूर हा सुवर्ण कारागिर आपला मित्र रबीउल गाझी व अलीहुसेन मंडल दोघेही राहणार गोलाहाटपूर-बराहीपूर, होरीमूल, दक्षिण 24 परगणा, प. बंगाल, सध्या राहणार दाणे गल्ली, शहापूर यांच्याबरोबर कारमधून गोव्याला जाताना ही घटना घडली आहे.

Advertisement

सायंकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास उचवडेजवळील बैलूर क्रॉसनजीक कार अडवून कारमधील सुवर्ण कारागिरांना जवळच असलेल्या एका शेतजमिनीत नेऊन त्यांना पिस्तूल व चाकूचा धाक दाखवत 1 लाख 200 रुपये रोख रक्कम पळविण्यात आले होते. रबीउल गाझी याच्याकडून 225 ग्रॅम सोने मागवून घेऊन तेही पळविण्यात आले होते.

एस. के. इबादुल या सुवर्ण कारागिराने आपल्यासोबत गोव्याला जाण्यासाठी कारमध्ये घेतलेल्या रबीउल रोहुल अमीन गाझी (वय 29) व अलीहुसेन कमरुद्दीन मंडल (वय 27)  हे दोघे फितूर निघाले आहेत. त्याच्या फितुरीमुळे हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी रबीउल व अलीहुसेन बरोबरच सादिक अब्दुलरेहमान तोरगल (वय 37) राहणार शहापूर, विवेक चंद्रकांत पाटील (वय 33) राहणार कपिलेश्वर मंदिराजवळ, प्रशांत महादेव चव्हाण (वय 37) राहणार तांगडी गल्ली, नितीन राजाराम चव्हाण (वय 36) राहणार गायत्रीनगर-खासबाग, दिगंबर नागेश पाटील (वय 26) राहणार शिवशक्तीनगर-अनगोळ व दरोड्यासाठी विवेक पाटीलला कंट्री पिस्तूल दिलेला मयुर राजू घाडी (वय 26) राहणार बसवाण गल्ली, शहापूर या आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक वीरय्या हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूरचे पोलीस निरीक्षक एल. एच. गवंडी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

ऐवज जप्त...

दरोड्यासाठी वापरलेली एक सुझुकी ब्रेझा, अर्टिगा व आय-20 कार, 1 लाख 200 रुपये रोख रक्कम, गावठी पिस्तूल, चाकू, आठ मोबाईल, एक मोटरसायकल, 205 ग्रॅम सोन्याचे बिस्कीट, 28 ग्रॅम बनावट सोन्याच्या बांगड्या असा एकूण 40 लाख 50 हजार 200 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.