‘टॉक्सीक’ला सुवर्ण मयूर
‘आयसीएफटी-युनेस्को गांधी’ पुरस्कार ‘क्रॉसिंग’ला : सर्वोत्कृष्ट वेब सिरीज ओटीटी पुरस्कार ‘लंपन’ सिरीजला,विक्रांत मस्सेना सर्वोत्कृष्ट भारतीय व्यक्तिमत्व पुरस्कार,ऑस्ट्रेलियाच्या नॉईस यांना ‘सत्यजित रे’ जीवन गौरव
संदीप कांबळे/पणजी
देश-विदेशांतील सिनेरसिकांनी गेले नऊ दिवस राज्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (आंचिम) आनंदोत्सव साजरा करताना राज्यातील या सोहळ्याचे गोव्यात होणाऱ्या या आयोजनाबद्दल भरभरून कौतुक केले. अशा या अभूतपूर्व 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल गुऊवारी बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये हजारो रसिकांच्या उपस्थितीत समारोप सोहळा थाटात साजरा झाला.
55व्या ‘आंचिम’मध्ये ‘टॉक्सीक’ या लिथूवानियाच्या चित्रपटाला सुवर्ण मयूर पुरस्कार देण्यात आला. लेवान अकिन दिग्दर्शित ‘क्रॉसिंग’ या चित्रपटाला ‘आयसीएफटी-युनेस्को गांधी’ पुरस्कार देण्यात आला. सर्वोत्कृष्ट वेब सिरीज म्हणून ओटीटी पुरस्कार ‘लंपन’ या सिरीजने जिंकला. यंदाचा ‘सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट व्यक्तिमत्त्व’ म्हणून विक्रांत मस्से यांना गौरवण्यात आले. ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक फिलिप नॉईस यांना ‘सत्यजित रे’ जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. या सोहळ्यात प्रमुख पुरस्कार प्राप्त झालेल्यांबरोबरच अन्य उपस्थित राहिलेल्या तेलगू, तामिळ, हिंदी, इंग्रजी, मराठी आदी भाषांतील चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री यांचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल देऊन गौरव करण्यात आला. आजही सिनेरसिकांच्या काळजात घर करून राहिलेला अजरामर सुपरहिट ‘शोले’ या चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
येत्या 5 डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या आगामी ‘पुष्पा 2’ या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी या चित्रपटातील संवाद रसिकांसमोर सादर करताना वाहवा मिळवली. त्यानंतर अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने ‘बलम सामे, बलम सामे, बलम सामी सामी सामी’ या गाण्यावर दिलखेचक नृत्य सादर करून सोहळ्यात जल्लोष निर्माण केला. त्यांचाही मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या समारोप सोहळ्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, इफ्फीचे संचालक शेखर कपूर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव संजय जाजू, अभिनेत्री रश्मिका मंदाना, श्रीया सरन, विक्रांत मस्से, आशुतोष गोवारीकर, रमेश सिप्पी, जया प्रदा आदी कलाकार उपस्थित होते. अरमान मलिक, मामे खान यांचे संगीत झाले. समीर कोचर यांनी सूत्रसंचालन केले.
‘आंचिम’मधील यंदाचे विजेते
1) सर्वोत्कृष्ट चित्रपट : ‘टॉक्सीक’ (लिथूवानिया)
2) उत्कृष्ट दिग्दर्शक : ‘बोगदान मुरेशान’ (द न्यू इयर देट नेव्हर कम)
3) उत्कृष्ट अभिनेता : ‘क्लेमेन्ट फावेयू’ (होली काव)
4) उत्कृष्ट अभिनेत्री : वेस्ता एम. आणि लेवा आर. (टॉक्सीक)
5) विशेष ज्युरी : लुईस कोर्सव्हेसेयर (होली काव)
6) ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक फिलीप नॉईस यांना ‘सत्यजित रे’ जीवन गौरव पुरस्कार
7) पदार्पण करणारे उत्कृष्ट भारतीय दिग्दर्शक : नवज्योत बांदिवडेकर (घरत गणपती)
8) पदार्पण उत्कृष्ट दिग्दर्शक : सारा फ्रिडलान्ड (फॅमिलीयर टच चित्रपट)
9) आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक : ‘क्रॉसिंग’
10) उत्कृष्ट वेब सिरीज (ओटीटी) : ‘लंपन’
विदेशी निर्मात्यांनीही गोव्यात चित्रीकरण करावे : मुख्यमंत्री
गोवा राज्यात आयोजित होणारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरत आहे. गोव्याचा लौकिक जागतिक पातळीवर पोहचला असून, इफ्फीमुळे गोव्यात साधन-सुविधांचे जाळे बळकट बनले आहे. स्थानिक चित्रपट निर्माते चित्रीकरणासाठी गोव्याला पसंती देतात. त्याचप्रमाणे विदेशी चित्रपट निर्मात्यांनीही गोव्यात विदेशी चित्रपटांचे चित्रीकरण करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
यशस्वी होण्यासाठी परिस्थिती नव्हे,परीश्रम महत्त्वाचे : विक्रांत मस्से
अभियंता विक्रांत मस्से यांना सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी नवोदित अभिनेता, अभिनेत्री यांना संदेश देताना सांगितले की, मुंबईमध्ये कलाकार होण्यासाठी अगदी ग्रामीण भागातून इच्छूक येत असतात. चित्रपटात येण्यासाठी तुम्ही श्रीमंत असायला हवे असे नसते. तुमची परिस्थिती हलाकीची असली किंवा तुम्हाला जरी इंग्रजी येत नसले तरी यामुळे चित्रपट करिअरवर कोणताच फरक पडत नाही. परंतु तुम्ही जरी परीस्थितीने गरीब असाल, तुम्हाला चांगले इंग्रजी बोलता येत नसेल तरी हताश न होता कठोर परिश्रम करण्याची जिद्द असेल तर यशस्वी होता येते. चित्रपटसृष्टीला कठोर परिश्रम करणाऱ्यांची आणि प्रामाणिक व्यक्तिमत्वाची गरज आहे, असे सांगून अभिनेता विक्रांत मस्से यांनी संपूर्ण सभागृहातील रसिकांची मने जिंकली. याआधी मी एक चित्रपट रसिक म्हणून इफ्फीमध्ये आलो होतो. आज याच मंचावर माझा सन्मान झाला, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे, असेही अभिनेता मस्से यांनी अभिमानाने सांगितले.