येडियुराप्पा यांच्या राजकीय कारकिर्दीचा सुवर्णमहोत्सव
चित्रदुर्ग येथे शनिवारी होणार ‘अभिमानोत्सव’
बेळगाव : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या राजकीय जीवनाला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या चाहत्यांकडून भव्य सत्कार केला जाणार आहे. शनिवार दि. 9 रोजी चित्रदुर्ग येथे ‘अभिमानोत्सव’ हा कार्यक्रम होणार असून बेळगाव जिल्ह्यातील 20 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती राज्यसभा माजी सदस्य पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
चित्रदुर्ग येथे होणाऱ्या कार्यक्रमात राज्यातील 5 लाख कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, एच. डी. कुमारस्वामी, माजी मुख्यमंत्री सदानंदगौडा, खासदार जगदीश शेट्टर यांच्यासह राज्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. देशभरातील स्वामींजीच्या दिव्य सानिध्यात हा कार्यक्रम होणार आहेत. कोणताही राजकीय अजेंडा न ठेवता केवळ येडियुराप्पा यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा मेळावा होणार आहे.
सर्व जाती-धर्मातील मठाधीश, कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत. राज्याच्या प्रगतीमध्ये बी. एस. येडियुराप्पा यांचे मोठे योगदान आहे, अशी माहिती विधानपरिषद माजी सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी दिली. यावेळी माजी आमदार संजय पाटील, अनिल बेनके, महानगर अध्यक्ष गीता सुतार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, अॅड. एम. बी. जिरली, माजी खासदार मंगला अंगडी, राजेंद्र हरकुणी, मुरगेंद्रगौडा पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.