परिस्थितीला ‘खो’ देणारी सुवर्णकन्या
सुवर्णकन्या ‘ सानिका चाफेची विक्रमी कामगिरी : 13 वेळा राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी निवड,महाराष्ट्राच्या कर्णधार पदाचा चौकार,चारही वेळी सुवर्णपदकाला गवसणी,यू-14, यू-17, यू-19 शालेय स्पर्धेत राष्ट्रीय विजेतेपद,यू-18 असोसिएशन स्पर्धेत राष्ट्रीय सुवर्णपदक,आतापर्यंत 10 राष्ट्रीय स्पर्धांतून सुवर्णपदके,राजमाता अहिल्यादेवी होळकर क्रीडा मंडळात सराव
सचिन भादुले/विटा
खानापूर तालुक्यातील भिकवडी जिह्याच्या सीमेवरील दुर्गम आणि लाल मातीतल्या कुस्तीसाठी ओळखले जाणारे गाव. याच गावातील सानिका चाफे या मुलीने खो खो खेळात महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषवित राष्ट्रीय सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. अत्यंत ग्रामीण भागात कोणत्याही सुविधा उपलब्ध नसताना परिस्थितीला ‘खो‘ देत ही सुवर्णकन्या राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवत आहे. ‘सुवर्णकन्या‘ सानिका चाफे हिची विक्रमी तेराव्यांदा राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यातील चार वेळा तिने राज्य संघाचे कर्णधारपद भूषविले आहे. महाराष्ट्र संघाची कर्णधार म्हणून सुवर्णपदक जिंकण्याचा मान तिने या चारही वेळा पटकावला आहे. कर्णधार म्हणून तिचा स्ट्राईक रेट शंभर टक्के आहे. त्यामुळेच तिच्या यशाचे कौतुक आहे.
भिकवडी जिह्याच्या सीमेवरील दुर्गम आणि लाल मातीतल्या कुस्तीसाठी ओळखले जाणारे गाव आहे. सानिका चाफे ही मूळची हिंगोली जिह्यातील लिंबी गावची. तिची आई भिकवडी येथे आरोग्य सेविका म्हणून रजू झाली. वडील शेती करतात. हे कुटुंब भिकवडी येथे स्थायिक झाले. भिकवडीतील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असताना इयत्ता तिसरीत असल्यापासून खो खो खेळण्यास तीने प्रारंभ केला. खेळातील हालचाली, लवचिकता, जिद्द, मेहनत पाहून प्रशिक्षक समीर माने यांनी तिचा खो खो चा सराव घेण्यास सुरूवात केली. तिसरीत असताना जिल्हास्तरीय व चौथीत असताना राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला आणि संघाने विजय मिळविला. शालेय स्पर्धेतून केंद्र पातळीवरून सुरू झालेला हा प्रवास कधी राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचला हे समजलेच नाही. 14 वर्षाखालील महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करीत ती राष्ट्रीय पातळीवर पोहोचली. पण त्या अगोदर तब्बल दहा सुवर्णपदकांना तिने गवसणी घातली होती. एकदा राष्ट्रीय पातळीवर पोहोचल्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही.
जिल्हा परिषद शाळेच्या मैदानातून राष्ट्रीय पातळीवर
भिकवडी गावच्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर सानिकासह संघातील अन्य खेळाडूंचा सराव चालतो. दररोज सकाळी साडेपाच ते साडेसहा व सायंकाळी सहा ते रात्री साडेआठपर्यंत न चुकता सराव असतो. सरावात सातत्य ठेवले आहे. प्रारंभी सराव करताना अडचणी आल्या. मैदान व्यवस्थित नव्हते. वीज नव्हती. या सर्व सुविधा ग्रामस्थ व पालकांनी उपलब्ध करून दिल्या. हॅलोजनच्या उजेडात सानिकासह खेळाडू या ठिकाणी सराव करतात. या मैदानातून एक दोन नव्हे तर तब्बल आठ राष्ट्रीय खेळाडू सध्याच्या संघात खेळत आहेत. यातीलच एक असण्राया सानिकाचा चाफेने तब्बल चार वेळा महाराष्ट्राच्या संघाचे वेगवेगळ्या स्पर्धेत कर्णधारपद भूषविले आहे.
आतापर्यंत सानिकाने सांगली, धुळे, परभणी, जालना, हिंगोली, बीड, धारशिव, अहिल्यानगर याठिकाणी राज्यस्तरीय तर हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, ओरिसा, बिहार, तामिळनाडू आणि गुजरात याठिकाणी राष्ट्रीय स्तरावर खो खो खेळून बक्षिसे मिळविली आहेत.
अत्यंत ग्रामीण भागातून येण्राया सानिकाने परिस्थिती ही यशाच्या मार्गात अडथळा ठरू शकत नाही हे दाखवून दिले आहे. सरावातील सातत्य, चिकाटी आणि एकाग्रता या बळावर तिने ग्रामीण भागातील खेळाडूं समोर वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे सानिकाला परिस्थितीला खो देणारी सुवर्णकन्या असे म्हटले जाते.
‘सानिकाची सुवर्ण कामगिरी’
कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात बारावीत शिकत असलेल्या सानिकाची आत्तापर्यंत 13 राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड झाली आहे. 10 राष्ट्रीय स्पर्धातून तिने सुवर्णपदके पटकावले आहेत. तर दोन राष्ट्रीय स्पर्धा अजून खेळायच्या आहेत.
14 वर्षाखालील आणि 17 वर्षाखालील
संघाचे महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषवलेल्या सानिका चाफे हिला या स्पर्धेतून सलग चौथ्यांदा महाराष्ट्राचे कर्णधार पद भूषवण्याचा बहुमान मिळाला आहे. तसेच सानिकाला 14 वर्षाखाली गटातील भारतातील सर्वोच्च ‘इला‘ पुरस्कार तर अठरा वर्षाखालील गटातील भारतातील सर्वोच्च जानकी पुरस्काराने आतापर्यंत गौरवण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या 51 व्या कुमार-मुली खो खो स्पर्धेत सानिका चाफे हिला मुलींच्या विभागात राज्यातील खो खो खेळातील सर्वोच्च अशा सावित्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
प्रशिक्षकांचे मोलाचे योगदान
खानापूर तालुक्याला खो खो खेळाची मोठी परंपरा लाभली आहे. मात्र भिकवडी बुद्रुकसारख्या लहान गावात राजमाता अहिल्यादेवी होळकर क्रीडा मंडळाची स्थापना करत क्रीडा क्षेत्रात एक नवीन अध्याय लिहिला गेला. खो खो खेळाचे प्रशिक्षक असलेल्या समीर माने, दत्ता पाटील, विकास तामखडे, प्रियंका शरनाथे आणि क्रीडा मंडळाचे अध्यक्ष संतोष मंडले यांनी दिवस-रात्र मेहनत घेऊन सानिका चाफेसह अनेक राष्ट्रीय पातळीवर गाजणारे खेळाडू घडवले. खेळाडूंच्या या यशात प्रशिक्षक आणि ग्रामस्थांचे देखील मोठे योगदान असल्याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.