सायकलच्या टायरमधून 1 कोटीचे सोने हस्तगत
मालदा :
पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात बीएसएफने गुप्त माहितीच्या आधारावर बांगलादेश सीमेवर तपासणी सुरु केली. यादरम्यान एका सायकलच्या टायरमधून सोन्याचे 7 बिस्कीट्स हस्तगत करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. मालदामध्ये एमएस पूर सीमा चौकीवर तैनात बीएसएफच्या 119 व्या बटालियनच्या जवानांना बांगलादेशातून भारतात सोन्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. ज्यानंतर सीमेवरील देखरेख वाढविण्यात आली होती. तपासणीदरम्यान एका सायकलचा टायर असामान्य स्थितीत दिसून आला. टायरची तपासणी केली असता त्यात सोने सापडले आहे. तर जवान सायकलची तपासणी करत असताना तस्कर पळ काढण्यास यशस्वी ठरला. तस्कर घनदाट लोकसंख्या असलेल्या भागात पळाला होता. यामुळे बीएसएफला तेथे कारवाई करता आली नाही. जप्त करण्यात आलेल्या सोन्याचे वजन 816.41 ग्रॅम आहे, याची अनुमानित किंमत 1 कोटी 02 लाख 40 हजार 230 रुपये असल्याचे समजते. तस्करीशी निगडित विश्वसनीय माहिती देणाऱ्यांना इनाम दिले जाईल आणि त्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे बीएसएफच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितले आहे.