बांगलादेशातून मुंबईत सोन्याची तस्करी
कुरिअरच्या माध्यमातून तस्करीचा कट : 2.398 किलो परदेशी सोने जप्त
मुंबई
बांगलादेशातून भारतात आणण्यात आलेल्या परदेशी बनावटीच्या सोन्याची मुंबईत तस्करी करणाऱ्या कथित टोळीचा महसूल गुप्तचर संचालनालयाने पर्दाफाश केला. भुलेश्वर परिसरातील कुरिअर कार्यालय आणि त्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईत तीन जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 2.398 किलो वजनाचे सहा पिवळ्या धातूचे बार तसेच सोन्याचे तुकडे जप्त करण्यात आले. या सोन्याची बाजारातील किंमत सुमारे 3.75 कोटी ऊपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई पथकाला परदेशी बनावटीचे सोने कुरिअरच्या माध्यमातून मुंबईत आणले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार भुलेश्वर परिसरातील कुरिअर कार्यालयावर लक्ष ठेवण्यात आले. संशयास्पद हालचाली आढळल्यानंतर अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यानंतर केलेल्या तपासणीत सोन्याचा साठा आढळून आला.
तिघांच्या हालचालींवर होती नजर
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये बदलापूरचा पी. एस. परमार (32), कामोठे येथील आर. आर. मोरे (39) आणि औरंगाबादचा ए. जी. कदम (41) यांचा समावेश असल्याचे वफत्त आहे. कदम हा तस्करी करून भारतात आणलेल्या परदेशी सोन्याची हाताळणी आणि वाहतूक नियंत्रित करीत असल्याचा तपास यंत्रणेचा संशय आहे.
तपासादरम्यान संबंधित सोन्याच्या वाहतुकीसाठी देशांतर्गत कुरिअर मार्गाचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. काही पार्सल कोलकाता आणि गुवाहाटीहून मुंबईकडे पाठविण्यात आल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. सोन्याचा अंतिम साठा नेमका कुठे केला जाणार होता, याचा तपास सुरू आहे.