विश्व तिरंदाजीत भारताला सुवर्ण, रौप्य
वृत्तसंस्था/ येचॉन (दक्षिण कोरिया)
येथे सुरु असलेल्या विश्वचषक स्टेज-2 तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या महिला तिरंदाजपटूंनी सांघिक कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. त्याचप्रमाणे भारताने मिश्र सांघिक प्रकारात रौप्यपदक मिळविले.
महिलांच्या सांघिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात भारताच्या ज्योती सुरेखा व्हेनाम, परनीत कौर आणि आदिती स्वामी यांनी अंतिम लढतीत तुर्कीचा 232-226 अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेतील भारताच्या या महिला त्रिकुटाचे सलग तिसरे सुवर्णपदक आहे. अंतिम लढतीत तुर्कीच्या हझल बुरुन, आएशा सुझेर आणि बेगम युवा यांनी शानदार कामगिरी केली. पण भारताच्या ज्योती, कौर आणि आदिती यांनी पहिल्या पासूनच एकही सेट न गमविताना शेवटपर्यंत 6 गुणांची आघाडी कायम राखत सुवर्णपदक पटकाविले. शांघाय येथे झालेल्या विश्वचषक तिरंदाजी स्टेज-1 स्पर्धेत महिलांच्या सांघिक कंपाऊंड प्रकारात इटलीचा पराभव करुन सुवर्णपदक मिळविले होते. तसेच त्यानंतर पॅरिसमध्ये झालेल्या विश्वचषक तिरंदाजी स्टेज-4 स्पर्धेत भारतीय महिला तिरंदाजपटूंनी सुवर्णपदक मिळविले होते. 2024 च्या हंगामामध्ये ज्योती सुरेखा व्हेनाम, परनीत कौर आणि आदिती स्वामी यांच्या कामगिरीत सातत्य राहिल्याने त्यांना हे यश मिळविता आले. आता या प्रकारात ज्योती, परनीत आणि आदिती हे विश्व चॅम्पियन ठरले आहेत.
या स्पर्धेत मिश्र सांघिक महिलांच्या कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात ज्योती सुरेखा व्हेनाम आणि प्रियांष यांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. अंतिम लढतीत अमेरिकेच्या ओलिव्हीया डिन आणि सॉवेर सुलिव्हान यांनी ज्योती आणि प्रियांष यांचा 155-153 अशा 2 गुणांच्या फरकाने पराभव करुन सुवर्णपदक मिळविले. ज्योती आणि प्रियांष यांना या क्रीडा प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत भारताला आणखी एक पदक मिळण्याची अपेक्षा आहे. पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात भारताचा तिरंदाजपटू प्रथमेश फुगेला पदक मिळविण्यासाठी आणखी एका विजयाची गरज आहे. त्याने या प्रकारात 2021 सालातील विश्वविजेता ऑस्ट्रियाचा निको विनेरचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला आहे. आता फुगेचा पदकासाठीचा सामना सातव्या मानांकित जेम्स लुझशी होणार आहे. शांघायमध्ये झालेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या भारतीय पुरुष संघामध्ये फुगेचा समावेश होता.