For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोन्याचे दर भडकले...चेनस्नॅचर सोकावले

12:40 PM Oct 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
सोन्याचे दर भडकले   चेनस्नॅचर सोकावले
Advertisement

शहर-उपनगरात गुन्हेगारीत वाढ : स्थानिक गुन्हेगारांच्या सहभागाची शक्यता,  कठोर कारवाई करण्याची जनतेतून मागणी

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात चेनस्नॅचिंगचे प्रकार वाढले आहेत. पंधरवड्यात खडेबाजार, माळमारुती व टिळकवाडी पोलीस स्थानकात तीन महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेऊन भामट्यांनी पलायन केले आहे. या तिन्ही घटनांची पोलिसात नोंद झाली आहे. एकेकाळी बेळगावात चेनस्नॅचिंग करण्यात इराणी टोळीतील गुन्हेगार सक्रिय होते. आता स्थानिक गुन्हेगारांनीही डोके वर काढल्याचे सामोरे आले आहे.

गेल्या दहा वर्षांपूर्वी इराणी टोळीतील गुन्हेगारांनी शहरात अक्षरश: हैदोस घातला होता. मोटरसायकलवरून येऊन एकाकी महिलांच्या गळ्यातील दागिने लांबवण्याबरोबरच पत्ता विचारण्याच्या बहाण्याने लक्ष विचलित करून वृद्धांच्या अंगावरील दागिने पळविण्यात येत होते. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर व पुणे येथील इराणी टोळीतील गुन्हेगारांच्या धरपकडीनंतर बेळगाव परिसरात चेनस्नॅचिंगच्या घटना घटल्या होत्या.

Advertisement

दहा वर्षांपूर्वी 4 एप्रिल 2015 रोजी चेनस्नॅचिंगच्या घटना थोपवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलवावी लागली होती. कारण त्यावेळच्या पालकमंत्र्यांकडे वाढत्या गुन्हेगारीबद्दल तक्रारी वाढल्या होत्या. या बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी 5 एप्रिल 2015 रोजी सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर.गड्डेकर यांच्यावर हल्ला करून पलायनाचा प्रयत्न करणाऱ्या इराणी टोळीतील गुन्हेगारावर गोळीबार करण्यात आला होता.

शहरात 33 गुन्हे केल्याची कबुली

शाहरुख फिरोज शेख (वय 32), मोहम्मदरफिक मेहबूब शेख (वय 60), महम्मद इराणी ऊर्फ जाफरी (वय 32), सलीम शेरअली शेख (वय 30), अब्बास इराणी (वय 35), हैदर मुसा इराणी (वय 32) या सहा जणांच्या इराणी टोळीतील गुन्हेगारांना 12 ऑगस्ट 2016 रोजी येथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. या गुन्हेगारांनी बेळगाव शहरात 33 गुन्हे केल्याची कबुली दिली होती. न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर इराणी टोळीतील गुन्हेगार बेळगावकडे फिरकले नव्हते. त्यानंतर फेब्रुवारी 2022 मध्ये पुन्हा इराणी टोळीचा वावर सुरू झाला. त्यावेळीही बेळगाव पोलिसांनी अहमदनगर, पुण्यातील इराणी गुन्हेगारांच्या शोधासाठी प्रयत्न केले होते. आता पुन्हा चेनस्नॅचिंगच्या घटना घडल्या आहेत. या गुन्ह्यांमागे इराणी टोळीतील गुन्हेगारच सक्रिय आहेत स्पष्ट  नाही.

10 ऑक्टोबर 2025 रोजी आशा सहदेव पाटील (वय 78) राहणार गवळी गल्ली, बेळगाव या वृद्धेच्या गळ्यातील 15 ग्रॅमची चेन सकाळी 6.20 ते 6.30 या वेळेत गोंधळी गल्ली परिसरातून पळविण्यात आली आहे. त्यानंतर 21 ऑक्टोबर 2025 रोजी शारदा शंकर कुडची (वय 50) राहणार रामतीर्थनगर या लक्ष्मीपूजन आटोपून मुलीबरोबर घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील 35 ग्रॅमचे मंगळसूत्र रामतीर्थनगर परिसरात रात्री 8 वाजता पळविण्यात आले आहे. 25 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी सर्वोदय कॉलनी, हिंदवाडी येथील शोभा मारुती होनगेकर (वय 67) या वृद्धेच्या गळ्यातील 15 ग्रॅमची चेन मोटरसायकलवरून आलेल्या भामट्यांनी पळविली आहे. ही घटना भरदुपारी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर घडली आहे. पंधरवड्यात घडलेल्या या तीन घटना लक्षात घेता यामागे कोणत्या टोळीतील गुन्हेगार सक्रिय आहेत, याचा शोध घेण्यात येत आहे.

उपलब्ध माहितीनुसार खडेबाजार व माळमारुती पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात झालेल्या चेनस्नॅचिंगच्या दोन घटनात स्थानिक गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे समजते. शनिवारी सर्वोदय कॉलनी हिंदवाडी परिसरात घडलेल्या चेनस्नॅचिंग प्रकरणातील गुन्हेगार स्थानिक आहेत की, परप्रांतीय आहेत? याचा उलगडा झाला नाही. या तिन्ही प्रकरणात गुंतलेल्या गुन्हेगारांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अनेक वेळा इराणी टोळीच्या नावे स्थानिक गुन्हेगारांनीही गुन्हे केल्याची उदाहरणे आहेत. शेजारच्या सांगली, कोल्हापूर व मिरजेतून येऊन चेनस्नॅचिंग करून पुन्हा गावी परतणाऱ्या गुन्हेगारांचीही धरपकड झाली होती.

लक्ष विचलित करून लुटण्यात तरबेज 

इराणी गुन्हेगार केवळ चेनस्नॅचिंगच करत नाहीत तर लक्ष विचलित करून नागरिकांना लुटण्यातही ते तरबेज असतात. ‘पुढे खून झाला आहे, आम्ही सीआयडीचे अधिकारी आहोत, दागिने सांभाळा’ असे सांगत बेळगावात अनेक वृद्धांची लूट करण्यात आली आहे. पत्ता विचारण्याच्या बहाण्यानेही सकाळी सकाळी घरासमोर सडारांगोळी करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने पळविल्याच्याही घटना यापूर्वी घडल्या आहेत.

या तिन्ही प्रकरणात मोटरसायकलवरून दोघे जण येतात, पाठीमागे बसलेला महिलांच्या गळ्यातील दागिन्यांना हात घालतो व हिसडा मारून ते पळवतो. मोटरसायकल चालवणारा गुन्हेगार तोपर्यंत मोटरसायकल सुरूच ठेवतो. या तिन्ही प्रकरणातही मोटरसायकलवरून दोघे जण येऊन दागिने पळविले आहेत. मात्र, गोंधळी गल्ली व रामतीर्थनगर परिसरात दागिने पळविणारे गुन्हेगार स्थानिक असावेत, असा संशय आहे. सर्वोदय कॉलनी, हिंदवाडी परिसरात घडलेल्या घटनेमागे कोणते गुन्हेगार सक्रिय आहेत? याचा शोध घेण्यात येत आहे.

कारागृहातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा गुन्हेगारी

सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे गुन्हेगार चोऱ्या, घरफोड्या करण्याबरोबरच चेनस्नॅचिंग प्रकरणातही गुंतले आहेत. वेगवेगळ्या प्रकरणातून कारागृहातून बाहेर पडल्यानंतर काही जण आपल्या साथीदारांना घेऊन गुन्हेगारीत उतरले आहेत. बेळगाव पोलिसांची डोकेदुखी वाढवणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत आहे. 10 ग्रॅमचे दागिने जरी पळविले तर त्याची किंमत सव्वा लाख रुपये इतकी होते. निम्म्या किमतीत त्याची विक्री केली तरी 50 ते 60 हजार रुपये गुन्हेगारांच्या हाती लागतात. त्यामुळेच चोऱ्या, घरफोड्या, चेनस्नॅचिंगचे प्रकार वाढल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी पोलीस दलासाठी काम करणाऱ्या खबऱ्यांची संख्याही मोठी होती. आता ही संख्या घटली आहे. पोलीस अधिकाऱ्यांवर सतत बंदोबस्ताचा ताण वाढतो आहे. त्याचाही परिणाम तपासकामावर होत आहे. काही अधिकारी तपासकामात गंभीर नाहीत, असे चित्र दिसून येते. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच पोलीस दलाला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, काही अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे पोलीस व सर्वसामान्य नागरिक यांच्यातील दरी वाढत चालली असून त्याचाही फायदा गुन्हेगार घेताना दिसत आहेत.

Advertisement
Tags :

.