Gold Price Increase: सुवर्ण झेप, नऊ महिन्यांत दरात 33 हजारांची वाढ, दर चढाच राहणार
नऊ महिन्यात सोन्याचा दर तब्बल 33 हजार 631 रुपयांनी वाढला
By : संतोष पाटील
कोल्हापूर : सोन्याच्या किमतीने यंदा रेकॉर्ड तोडत दर आकाशाला भिडला आहे. गतवर्षी 31 डिसेंबरला 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत सर्वसाधारणपणे 76 हजार 162 रुपयांवर पोहोचली होती. आज 9 महिन्यांनी तेच सोनं 1 लाख 11 हजार 167 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
नऊ महिन्यात सोन्याचा दर तब्बल 33 हजार 631 रुपयांनी वाढला. तर 86 हजार रुपये किलो असणारा चांदीचा दर नऊ महिन्यात 41 हजारांनी वाढून एक लाख 32 हजार 170 रूपये किलोवर गेला आहे.
सोने किमतीत तेजीचे पाच प्रमुख कारणे
जागतिक अनिश्चितता : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ योजनांमुळे व्यापार युद्धाची भीती वाढली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळत आहेत. परिणामी मागणी वाढली आहे.
केंद्रीय बँकांचे खरेदी : चीन, रशियासारख्या देशांच्या केंद्रीय बँका मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहेत. त्यामुळे जागतिक सोन्याची मागणी 20 टक्क्यांनी वाढल्याचे अहवाल सांगतात.
युद्ध आणि तणाव : रशिया-युक्रेन युद्ध अजून संपलेले नाही. मध्य पूर्वेकडील भू-राजकीय तणाव वाढला आहे. अशा िस्थतीत सोने हा ‘सुरक्षित आर्थिक आश्रय’ ठरत आहे.
महागाई आणि कमी व्याजदर : मुद्रा स्फितीची भीती आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून कमी व्याजदर यामुळे सोन्याची आकर्षकता वाढली आहे. कमी व्याजदरांमुळे सोन्यावर परतावा मिळवणे सोपे झाले आहे.
रुपयाची डॉलरसमोर घसरण : डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरल्याने सोन्याची आयात महाग झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत किंमती वाढल्या.
सोने खरेदी करताना याकडे लक्ष द्या प्रमाणित सोना खरेदी करा : नेहमी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सचे (बीएसआय) हॉलमार्क असलेले प्रमाणित सोने घ्या. नवीन नियमांनुसार, सहा अंकी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंगशिवाय सोने विक्रीसाठी परवानगी नाही. आधार कार्डवरील 12 अंकी कोडप्रमाणे, सोन्यावर सहा अंकी एचयूआयडी (हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर) असतो. त्यामुळे सोन्याची शुद्धता (कॅरेट) सहज तपासता येते. किंमत क्रॉस-चेक करा : सोन्याचे नेमके वजन, त्या दिवसाची किंमत इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटसारख्या अनेक स्रोतांवरून तपासून घ्या.
24 कॅरेट सोने सर्वांत शुद्ध असते. पण ते मऊ असल्याने ज्वेलरीसाठी 22 कॅरेटच्या सोन्याचा वापर होतो. सोन्याची किंमत 24, 22 आणि 18 कॅरेटनुसार बदलतात. सोन्याच्या या तेजीत गुंतवणूक करताना बाजारातील चढ-उतार लक्षात घ्या. दर चढाच राहणार जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे सोन्याला ‘सुरक्षित गुंतवणूक“ म्हणून प्राधान्य मिळत आहे.
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणांमुळे भू-राजकीय तणाव कायम राहिला आहे. त्यामुळे सोन्याला सतत आधार मिळत आहे. मागणी वाढत आहे. लवकरच 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1 लाख 15 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज आहे. चांदीची किंमत 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. गोल्डमन सॅ क्ससारख्या संस्थांनी 2025 साठी सोन्याचा अंदाज 2 हजार पन्नास डॉलर प्रति औंस असा वर्तवला आहे. ज्यामुळे भारतीय बाजारात आणखी वाढ अपेक्षित आहे.