शंभर वर्षात सोनेदरात साडेतीन हजार पटीने वाढ; वर्षात 10 ग्रॅममागे 10 हजारांची वाढ
कोल्हापूर विद्याधर पिंपळे
शंभर वर्षांपूर्वी सोन्याचा तेंळ्याच्या (11.663 मिलीग्रॅम) दर 18.75 पैसे होता. आज सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 67 हजार 500 रूपये झाला आहे. शंभर वर्षात सोन्याचा दरात साडेतीन हजार पटीने वाढ झाली आहे. अवघ्या एका वर्षात सोन्याच्या दरात 10 हजार रूपयांनी म्हणजेच 22 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोने दराची वाटचाल 70 हजारांपर्यंत जाण्याचे संकेत फेब्रुवारीमध्ये दिले होते.
सोने मौल्यवान आहे. जगात सोने खरेदीमध्ये भारताचा चीननंतर दुसरा क्रमांक आहे. पेट्रोल-डिझेलनंतर सोन्याची आयात मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे देशाच्या परकीय चलनावर ताण येत आहे. सोन्यावरील 18 टक्के करापैकी 12.50 टक्के कर आयातीसाठी भरावा लागत आहे. तरीही सोन्याच्या मागणीत सतत वाढ होत आहे. आयात शुल्क वाढवल्यास, सोने तस्करीला प्रोत्साहन मिळते. दुबईमध्ये सोन्याचा दर कमी असल्याने, दुबईमधून सोन्याची तस्करी होत आहे. भारतात आयात होणाऱ्या सोन्यापैकी 1/6 सोने हे अवैध मार्गाने भारतात येत असल्याचा अहवाल आहे.
डॉलरचा दर, आंतरराष्ट्रीय बँकांमधील दिवाळखोरी, युध्द, विवाह सोहळा, निवडणुका हे सोने दरवाढीचे कारण असल्याची सराफ बाजारात चर्चा आहे. सोन्याचा दर कमी झाल्यास, मागणी वाढून परकीय चलनावर परिणाम होतो. शेअर मार्केट कोसळल्यास सोने खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे चित्र आहे.
कोल्हापूरच्या सोन्याचा दर हा, इंडियन बुलियन असोसिएशनव्दारे दिला जातो. 1963 ते 1968 या काळात सुवर्ण नियंत्रण कायदा होता. 1975 ते 77 दरम्यान देशातील आणीबाणी, त्यानंतर कोरोना, युध्दाचा परिणाम सोने खरेदी-विक्रीवर झाला आहे. सोने आपत्कालीन काळातील आधार असल्याने, दर वाढ होऊन देखील, गुंजभर दागिन्याची खरेदी होत असते.
शंभर वर्षामध्ये सोन्याच्या दरात झालेली वाढ
वर्ष सोने दर तोळे (रूपयांत)
1925 18.75
1945 62.00
1966 83. 75
1987 2570.00
2008 12500.00
दशमान पध्दत बदलली
सोन्याचे वजन पध्दती काळानुसार बदलली आहे. 1956 मध्ये दशमान पध्दत आल्याने सोन्याचा दर तोळयाऐवजी 10 ग्रॅमवर होऊ लागले आहेत. तोळयापूर्वी आठ गुंजा म्हणजे एक मासा. तर 12 मासा म्हणजे एक तोळा असे औळखले जात असे.
या वर्षातील सोन्याचा महिनाअखेरचा दर
2023 सोने दर (10 ग्रॅम)
मार्च 57500
एप्रिल 61200
मे 61900
जून 61900
जुलै 60000
ऑगस्ट 60900
सप्टेंबर 61000
ऑक्टोबर 58500
नोव्हेंबर 62800
डिसेंबर 64800
जानेवारी 64700
पेब्रुवारी 63900
मार्च (11 मार्च) 67500