Karad Crime : कराड बसस्थानकातून वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची माळ लंपास
कराडमध्ये अडीच तोळ्याची सोन्याची माळ लंपास
कराड : कराड बसस्थानकात रविवारी सायंकाळी प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची माळ हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी सैनिकाची पत्नी असलेल्या सुभद्रा उत्तम मुगडे (रा. सणबूर, ता. ढेबेवाडी) या रविवारी उपचारासाठी कराड येथे आल्या होत्या.रुग्णालयात औषधोपचार झाल्यानंतर त्या आपली मुलगी नीलम शंकर जाधव यांच्यासह सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास ढेबेवाडी येथे परत जाण्यासाठी कराड बसस्थानकात गेल्या होत्या.
ढेबेवाडीची एसटी बस लागल्यानंतर प्रवाशांची मोठी गर्दी झाली. बसमध्ये जागा मिळवण्यासाठी मुलगी नीलम जाधव या पुढे गेल्या असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी सुभद्रा मुगडे यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची माळ हिसकावण्याचा प्रयत्न केला. काही क्षणांतच दोन संशयित चोरट्यांनी माळ जोरात ओढून तोडली व घटनास्थळावरून पसार झाले.