For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चांदीचे सुवर्णपदक

06:30 AM Jan 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
चांदीचे सुवर्णपदक
Advertisement

भारतीय गुंतवणूक मानसिकतेमध्ये सोने, चांदी या मौल्यवान धातूंना अतिशय महत्त्वाचे स्थान असून साहजिकच त्याच्या दरात होणारे बदल त्यामुळे महत्त्वाचे ठरतात. ‘सुवर्ण’ मोहातून ‘रामायण’ घडले तरी सर्व स्तरातील महिला सोन्याबाबत संवेदनशील असतात. सध्या सोन्यापेक्षा चांदीचे दर अधिक वेगाने वाढत असून दरवाढीच्या मॅरॅथॉन स्पर्धेत चांदीने सुवर्णपदक जिंकले आहे!

Advertisement

सोने, चांदी यांची दरवाढ समजून घेताना त्यावर परिणाम करणारे विविध आर्थिक व आंतरराष्ट्रीय घटक पाहणे गरजेचे असते. सोन्या-चांदीच्या किंमती पाहून ‘आमच्या काळात स्वस्त होते’ ही प्रतिक्रिया स्वाभाविक ठरते. भविष्यकाळात सोने चांदी दरात नेमकी कोणती दिशा असेल. चांदीची दरवाढ तात्पुरती आहे का दीर्घकालीन ठरणार, गुंतवणूक चांदीमध्ये आता करावी का असलेली चांदी विक्री करावी, असे अनेकप्रश्न यानिमित्ताने निर्माण होतात. यासाठी चांदीच्या दरातील ही ‘रजतक्रांती’ समजून घेणे आवश्यक ठरते. चांदी हे सर्वसामान्यांचे सोने मानले जाते. कारण ते तुलनेने स्वस्त आहे. परंतु बदलत्या कालखंडासोबत चांदीची चमक अधिक प्रभावी ठरली आहे.

दराची चमक-2025 हे वर्ष सोन्या चांदीचे वर्ष ठरले. गुंतवणुकीच्या पारंपरिक मानसिकतेला बळकट करणारा परतावा या दोन्ही मौल्यवान धातूंनी दिला. या दरातील आकर्षक परतावा गुंतवणुकदारांना आता आकर्षित करीत असला तरी यातील फरक लक्षात घेऊनच निर्णय घेणे योग्य ठरेल. चांदी हे प्रकाशात चमकते तर सोने हे अंधारातही उजळते, असे म्हटले जाते. चांदी हे दागिन्यापेक्षा औद्योगिक वापरात महत्त्वाचे असल्याने तंत्र प्रगतीसोबत त्याची मागणी वाढते. आर्थिक प्रगतीचा प्रकाश चांदीला चमक देतो. सोने मात्र सार्वकालिक आणि सार्वत्रिक मान्यता असणारे मूल्यसंग्राहक असल्याने आर्थिक अनिश्चितता, युद्ध स्थिती, भू राजकीय अस्थिरता अशा संकटात आश्वासक म्हणून कार्य करते. गेल्या दोन ते तीन दशकात सोने व चांदी यांनी चांगला परतावा दिला असला तरी चांदीच्या परताव्यात जेवढे चढउतार दिसतात, तेवढ्या प्रमाणात सोन्यामध्ये दिसत नाहीत. याचाच अर्थ सोने अधिक स्थिर परतावा देते. चांदी ही सोन्याच्या दराशी तुलना केली तर सोन्याला मोठी किंमत द्यावी लागत असल्याने चांदी ही गरिबाचे सोने ठरते! आपल्या एकूण गुंतवणुकीत जोखीम कमी करण्यासाठी साधारण 20 ते 30 टक्के गुंतवणूक सोने चांदी यामध्ये करण्याचा सल्ला दिला जातो. औद्योगिक प्रगतीचा फायदा घेण्यासाठी चांदी तर भाववाढ, वित्तीय स्तरावर प्रतिबंधक साधन म्हणून सोने महत्त्वाचे ठरते.

Advertisement

सोने-चांदी गुणोत्तर- चांदीमध्ये गुंतवणूक करावी का सोने घ्यावे या प्रश्नामध्ये संभ्रमात असणारे असंख्य असतात. सध्या दोन्हींचे दर वाढलेले असल्याने हा गोंधळ आणखी वाढतो. यासाठी शास्त्रशुद्ध निकष म्हणजे चांदी तुलनेने महाग आहे का स्वत आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरते. सोने, चांदी गुणोत्तर याबाबत मार्गदर्शक ठरू शकते. एक ग्रॅम सोने घेण्यास किती ग्रॅम चांदी द्यावी लागते असे हे गुणोत्तर आहे. जर हे गुणोत्तर 12 असेल तर 1 ग्रॅम सोन्यास 12 ग्रॅम चांदी द्यावी लागेल, असा अर्थ आहे. असे गुणोत्तर रोमन साम्राज्यात 18 व्या शतकात होते. अमेरिकेने टांकसाळीसाठी 17 हे गुणोत्तर ठेवले हे गुणोत्तर सातत्याने बदलत असते. 1974 मध्ये 32 तर 1975 मध्ये 41.7 झाले. 1991 मध्ये 100 पर्यंत पोहचले. 2020 किंवा कोविड काळात 50 ते 80 असे गुणोत्तर होते. अलीकडे 2024 मध्ये 88.5 तर 2025 डिसेंबरमध्ये 67 झाले. चांदी-सोने यात स्वस्त कोणते हे ठरवण्यासाठी या सुत्राचा वापर होतो. जेव्हा हे गुणोत्तर 80 पेक्षा अधिक होते तेव्हा चांदी स्वस्त व सोने महाग ठरते. उलट जेव्हा हे गुणोत्तर 60 पेक्षा खाली येते तेव्हा चांदी महाग ठरते. भविष्य काळात चांदी किंवा सोने अशा पेचप्रसंगात सोने-चांदी गुणोत्तर उपयुक्त ठरते.

चांदी दरवाढीची कारणमीमांसा- 2025 हे वर्ष चांदीची दर झळाळी दाखवणारे व सर्वाधिक वार्षिक परतावा देणारे ठरले. चांदीचा परतावा 165 टक्के ठरला! चांदीने किलोसाठी असणारा दर एका वर्षात जेवढा वाढत असे तो आता दिवसागणिक वाढताना दिसतो. चांदीने 2 लाखाचा टप्पा ओलांडत 2.50 लाख गाठल्यानंतर पुन्हा त्यात घसरणही झाली. हे सर्व चढउतार समजून घेणे व चांदीची पुढील वाटचाल समजणे यासाठी चांदीचे अर्थकारण व राजकारण समजणे महत्त्वाचे ठरते. चांदी ही अनेक औद्योगिक उत्पादनात वापरली जाते. यामध्ये इव्ही बॅटरीसाठी, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक सर्कीट, सोलर पॅनेल अशा विविध वापरांचा समावेश होतो. गेल्या 5 वर्षात उत्पादनापेक्षा मागणी  अधिक राहिल्याने दरात वाढ होत आहे. इव्ही कारसाठी जी नवी सॉलिड स्टेट बॅटरी संशोधित आहे त्यामध्ये एका कारसाठी 1 किलो चांदी वापरावी लागेल. परिणामी उत्पादित सर्व चांदी जरी यात वापरली तरी ती अपुरी ठरेल! इतर वापराची मागणी लक्षात घेता ‘चांदीचा दुष्काळ’ असे भविष्यकालीन चित्र लक्षात घेऊन चांदीचे दर वाढत आहेत. यात चांदीचे नवे उत्पादन कमी असून पुनर्वापर किंवा स्क्रॅपमधून थोडा पुरवठा होतो. सोलर पॅनेल, इलेक्ट्रॉनिक साधने चांदी वापरावर अवलंबून असून भविष्यकाळात आवश्यक गरजेसाठी चीनने मोठा साठा केला आहे. चांदी पुरवठ्यात चीनचे धोरण महत्त्वाचे ठरते. जानेवारी 2026 पासून चांदी निर्यातीवर चीनने बंधने घालत  परवाना पद्धत सुरु केली आहे. विविध राष्ट्रांनी सोन्यासोबत चांदीही राखीव गंगाजळीत वाढवली आहे. डॉलरवरील अवलंबन कमी करण्याचा भाग म्हणून सोने व चांदी यांना डॉलर पर्यायी वापरणे हा धोरणात्मक बदलसुद्धा मौल्यवान धातू (सोने-चांदी) मागणी वाढीस कारक आहे. सध्या एआय डेटा सेंटर वाढत असून तेथेही चांदी लागते. अनेक आरोग्य साधने चांदीचा वापर करतात. यात चांदीची दरवाढ लपलेली आहे.

चांदी 3 ते 9 लाख? -भविष्यकाळात विशेष 2026मध्ये चांदीचा परतावा 2025 इतका असणार नाही असे अंदाज असून 2 वर्षात चांदी 3 लाखाचा टप्पा पार करेल तर 5 ते 8 वर्षात 9 लाखाचा टप्पा पार करेल असे अंदाज तंत्रकल अभ्यासक व्यक्त करतात. चांदीचा दर आलेख 50 प्रति औंस आधारस्तर असून सध्या 80 डॉलर प्रति औंस दर 250 ते 300 डॉलर प्रती औंस असा अंदाज व्यक्त  करतात. चांदीने फार मोठी दर झेप घेतलेली असल्याने त्यामध्ये घटीची शक्यता अधिक व्यक्त होते. यासाठी प्रत्यक्ष चांदी ऐवजी चांदीचे ईटीएफ गुंतवणुकीस अधिक योग्य ठरतात. ही गुंतवणूक टप्प्याटप्प्याने सातत्यपूर्ण करणे हा उत्तम पर्याय ठरतो. चांदी-सोने आधारित म्युच्युअल फंडही अधिक सुरक्षित ठरतात. चांदीच्या दरवाढीची सुरी आपला खिसा कापणार नाही, याची दक्षता आवश्यक ठरते!

प्रा. डॉ. विजय ककडे

Advertisement
Tags :

.