For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

छत्तीसगडला महिला फुटबॉलचे सुवर्णपदक

06:23 AM Apr 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
छत्तीसगडला महिला फुटबॉलचे सुवर्णपदक
Advertisement

खेलो इंडिया ट्रायबल गेम्स : कर्नाटकाच्या रितूश्री व नागिनी यांना दुसरे सुवर्ण

Advertisement

वृत्तसंस्था/रायपूर  (छत्तीसगड)

येथे सुरु असलेल्या 2026 च्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्समध्ये छत्तीसगडने महिला फुटबॉल या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. तसेच अॅथलेटिक्स या क्रीडा प्रकारातील शेवटच्या दिवशी कर्नाटकाच्या रितूश्री आणि नागिनी तसेच सोरेन यांनी आपले वैयक्तिक दुसरे सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत सोरेन हा सर्वात वेगवान धावपटू ठरला आहे. पदक तक्त्यात कर्नाटक 23 सुवर्ण, 8 रौप्य आणि 7 कांस्यपदकांसह पहिल्या स्थानावर आहे. ओडीशा 20 सुवर्ण, 13 रौप्य आणि 21 कांस्यपदकांसह दुसरे तर झारखंडने 14 सुवर्ण, 7 रौप्य आणि 11 कांस्यपदकांसह तिसरे स्थान घेतले आहे.

Advertisement

महिलांच्या फुटबॉल या क्रीडा प्रकारातील झालेल्या अंतिम सामन्यात छत्तीसगडने झारखंडचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव करत सुवर्णपदक मिळविले. या सामन्यातील एकमेव निर्णायक विजयी गोल छत्तीसगड संघाची कर्णधार किरण पिसदाने नोंदविला. या अंतिम सामन्यात मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराचा होता. दोन्ही संघांचा खेळ दर्जेदार झाला. 61 व्या मिनिटाला छत्तीसगडच्या कर्णधार किरण पिसदाने झारखंडच्या बचावफळीतील खेळाडुंना हुलकावणी देत आपल्या संघाचा एकमेव विजयी गोल नोंदविला.

यजमान छत्तीसगडने पुरुषांच्या 4×400 मी. रिले प्रकारात रौप्यपदक तर पुरुषांच्या 1500 मी. धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक घेतले. झारखंडच्या शिवकुमार सोरेनने या स्पर्धेमध्ये पुरुषांच्या 100 आणि 200 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदके मिळवून सर्वात जलद धावपटू ठरला. खेलो इंडियातर्फे ही स्पर्धा पहिल्यांदाच भरविली गेली असून यामध्ये 30 राज्यातील तसेच केंद्रशासीत प्रदेशातील सुमारे 3800 खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत तिरंदाजीत, अॅथलेटिक्स, फुटबॉल, हॉकी, जलतरण, वेट लिफ्टिंग, कुस्ती या क्रीडा प्रकारांचा समावेश असून मलखांब आणि कब•ाr हे दोन क्रीडा प्रकार केवळ प्रात्यक्षिक म्हणून घेतले जात आहेत.

रितूश्रीला दोन सुवर्णपदके

पुरुषांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीत सोरेन 21.51 सेकंदाचा अवधी देत सुवर्णपदक मिळविले. तसेच कर्नाटकाची धावपटू रितूश्रीने महिलांच्या विभागात 200 आणि 400 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदके पटकाविली. रितूश्रीने 200 मी. धावण्याच्या शर्यतीत 25.87 सेकंदाचा अवधी नोंदविला. त्याचप्रमाणे कर्नाटकाच्या नागिनीने महिलांच्या 800 मी. तसेच 1500 मी. धावण्याच्या शर्यतीत दोन सुवर्णपदके मिळविली. यजमान छत्तीसगडने पुरुषांच्या 4×100 मी. रिलेमध्ये रौप्यपदक घेतले. या क्रीडा प्रकारात ओडीशाने सुवर्ण तर छत्तीसगडने कांस्यपदक मिळविले. पुरुषांच्या 1500 मी. धावण्याच्या शर्यतीत झारखंडच्या राहुल ओरोनने सुवर्णपदक, महाराष्ट्राच्या कार्तिक करील्हारपालने रौप्यपदक मिळविले. या स्पर्धेत यजमान छत्तीसगडने पदक तक्त्यात नववे स्थान मिळविताना 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 6 कांस्यपदकांची कमाई केली. झारखंडने तिरंदाजी क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळविले. महिलांच्या कंपाऊंड वैयक्तिक तिरंदाजी प्रकारात आंध्रप्रदेशच्या प्रिया बनावतने सुवर्ण, झारखंडच्या मेघा बिसराने रौप्य तर महाराष्ट्राच्या वैष्णवी परदेशीने कांस्यपदक मिळविले. कंपाऊंड सांघिक तिरंदाजी प्रकारात मेघालयने सुवर्ण, नागालँडने रौप्य तर झारखंडने कांस्यपदक घेतले. पुरुषांच्या कंपाऊंड तिरंदाजीत वैयक्तिक प्रकारात महाराष्ट्राच्या हर्षवर्धन इंगळेने सुवर्णपदक मिळविले. पुरुषांच्या सांघिक तिरंदाजी कंपाऊंड प्रकारात मेघालयने सुवर्ण, आसामने रौप्य पदक घेतले. कंपाऊंड मिश्र सांघिक तिरंदाजी प्रकारात महाराष्ट्राने (हर्षवर्धने इंगळे) सुवर्ण तर आंध्र प्रदेशने रौप्य पदक घेतले. रिकर्व्ह मिश्र सांघिक तिरंदाजी प्रकारात झारखंडने सुवर्ण, ओडिशाने रौप्य तर नागालँडने कांस्यपदक घेतले.

Advertisement
Tags :

.