डंकन स्कॉटला सुवर्णपदक
स्कॉटलंडच्या डंकन स्कॉटला सुवर्ण
स्कॉटलंडच्या डंकन स्कॉटने आतापर्यंत 8 वेळा ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळविले आहे. त्याने पुरूषांच्या 200 मी. वैयक्तिक मिडले प्रकारात पहिले सुवर्णपदक नव्या स्पर्धा विक्रमासह पटकाविले. त्याने या क्रीडा प्रकारात 1 मिनिट 56.38 सेकंदाचा अवधी घेतला. या कामगिरीबद्दल स्कॉटलंडचा माजी ऑलिम्पिक पदक विजेता टॉमडिनने स्कॉटचे खास अभिनंदन केले आहे.
भारताचा पराभव
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शनिवारी झालेल्या महिलांच्या व्हिलचेअर बास्केटबॉल प्रकारातील ब गटातील सामन्यात वेल्सने भारताचा 16-1 असा एकतर्फी पराभव केला. या सामन्यात वेल्सच्या खेळाडूंनी भारताच्या तुलनेत दर्जेदार कामगिरी करताना आक्रमक खेळावर अधिक भर दिला होता. भारतीय बास्केटबॉल संघाला पहिल्याच सामन्यात हार पत्करावी लागल्याने त्यांना या स्पर्धेतील उर्वरित सामन्यात विजयासाठी झगडावे लागेल. 
ऑस्ट्रेलियाला 4×100 मी. फ्रिस्टाईल मध्ये पुरुष व महिला संघाला सुवर्ण
2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शनिवारी ऑस्ट्रेलियाच्या महिला जलतरणपटूंनी 4×100 मी. फ्रिस्टाईल रिले प्रकारात आपले पुन्हा वर्चस्व राखत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. 1998 पासून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत या क्रीडा प्रकारात ऑस्ट्रेलियाच्या महिला जलतरणपटूंनी प्रत्येकवेळा सुवर्णपदक पटकाविले आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेग हॅरीस, शायना जॅक, अॅलेक्स पर्टीन्स आणि मॉली ओकॅलेगेन यांनी या क्रीडा प्रकारात 3 मिनिटे, 31.40 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक मिळविले तर इंग्लंडच्या स्पर्धकांनी 3 मिनिटे 35.66 सेकांदाचा अवधी घेत रौप्य, द. आफ्रिकेने 3 मिनिटे 38.67 सेकंदाचा अवधी घेत कांस्यपदक पटकाविले. तर पुरूषांच्या 4×100 फ्रिस्टाईल रिले जलतरण प्रकारात ऑस्टेलियाने सुवर्णपदकाला गवसणी घातली. ऑस्ट्रेलियाच्या जलतरणपटूने या क्रीडा प्रकारात नवा स्पर्धा विक्रम करताना 3 मिनिटे 09.49 सेकांदाचा अवधी नोंदविला. या क्रीडा प्रकारात ब्रिटनने रौप्यपदक तर दक्षिण आफ्रिकेने कांस्यपदक मिळविले.